आंबेडकर बावडी व पंचाची चावडीच्या सुशोभिकरणाची मागणी
सोलापूर : वळसंग येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उद्घाटन केलेली विहीर (आंबेडकर बावडी ) व कुंभारी येथील पंचाची चावडी परिसर सुशोभिकरण करण्यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
राजस्तरीय रोजगार मेळावा १२, १३ डिसेंबरला
सोलापूर : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत १२ आणि १३ डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात राज्यातील नामवंत उद्योजक, आस्थापनांमध्ये रिक्त असलेली ५० हजारांपेक्षा पदे https : // rojgar . mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा. त्यांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.
छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी
सोलापूर : छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २२४व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माधुरी डहाळे, आशुतोष नाटकर, शेखर बंगाळे, करण गडदे, सचिन हाके, साई पालवे, विशाल पाटील, निवृत्ती वलेकर, विकास शिंगाडे, सागर चोपडे, राज व्हनमाने, संतू बन्ने, चेतन पुजारी उपस्थित होते.
पंप संच, पाइपलाइनसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून पंप संच आणि पाइप, तुषार संच देण्यात येणार आहे. त्यासाठी ७ ते १७ डिसेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी https : // mahadbtmahait . gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या योजनेतून १० एचपीचा पंप संच दहा हजार रुपये मर्यादित आणि दहा हजार रुपयांपर्यंत पाइपसाठी अनुदान दिले जाणार आहे. जास्त अर्ज आल्यास ऑनलाइन सोडतीद्वारे तालुकास्तरावर लाभार्थी निवड केली जाईल, अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
माणुसकी संस्थेतर्फे २५० जणांचे रक्तदान
सोलापूर : माणुसकी हाच धर्म युथ फाउण्डेशन सामाजिक संस्थेमार्फत मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद पोलीस व सामान्य नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २५० रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय राऊत, शहमा हायस्कूलचे चेअरमन अय्युब नल्लाबंदू, आलम बिराजदार, इरून मंगलगिरी व इस्लामोद्दीन शेख उपस्थित होते.
सायकल स्टॅण्ड व स्टेशनरी फी माफ
सोलापूर : महाविद्यालयीन प्रवेशावेळी अनेक प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागत आहे. मात्र ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे पदवी व पदव्युत्तर प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून सायकल स्टॅण्ड फी, स्टेशनरी फी घेऊ नये, अशी सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. यंदा जिमखाना फी १०० रुपये असेल. तसेच इंटरनेट फी १० रुपये असेल, उर्वरित फी अभ्यासक्रमानुसार असतील, अशी सूचना देण्यात आली आहे.
निरीक्षण दक्षता समिती सदस्यांची सभा संपन्न
सोलापूर : येथील एम.ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात निरीक्षण दक्षता समिती सदस्यांची सभा पार पडली. या सभेत संस्थेच्या दोन्ही इमारतींविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य मौलाना इब्राहिम कासमी, नगरसेवक बाबा मिस्री, हाजी अय्युब मंगलगिरी, मैनोद्दीन शेख, नसीर खलिफा, बशीर दौलताबाद, निजामुद्दीन शेख, रईस शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल शेख, प्राचार्य डॉ. हारुन बागवान, सुरय्या जहागीरदार, सदफ शेख उपस्थित होते.
परीक्षा आयोजनाबाबत विद्यार्थी सेनेचे निवेदन
सोलापूर : राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षांचे आयोजन लवकरात लवकर करण्याबाबत भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष लहू गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले. काही उमेदवारांचे वयाची मर्यादा संपत आहे. त्यांच्या भविष्याची काळजी करून या परीक्षा आयोजिल्या जाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रोहन जवळकर, उपजिल्हाप्रमुख पृथ्वी खैरमोडे, जिल्हा सचिव रोहित अक्कलकोटे, शहरप्रमुख तुषार आवताडे, शहर समन्वयक प्रथमेश तपासे, उपशहरप्रमुख विजय मोटे, उपशहर प्रमुख करण लांबतुरे, सोहन जगताप, ओंकार केंगार, लक्ष्मीकांत म्हमाणे, श्रेयस हंचाटे, आकाश जाधव, प्रतीक तपासे उपस्थित होते.
अंधशाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
सोलापूर : ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंधशाळेत ‘जागतिक दिव्यांग दिन’ कार्यक्रम सपन्न झाला. प्रमुख पाहुणे रितेश होनराव यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर व महामानव लुई सायमन ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.बी. तांबे, विशेष शिक्षिका पावटे, के.एम. करजगी, सी.एस. कुंभार, गृहपाल कांबळे उपस्थित होते.