सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी हटवून पर्यायी चिमणी उभारण्यास तयार आहे; मात्र पर्यायी चिमणीची जागा विमानतळ विकास प्राधिकरणानेच निश्चित करावी, असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. हा विषय आता चर्चेत न ठेवता प्राधिकरणाने पुढील १५ दिवसात जागा निश्चित करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्राधिकरणाला दिले.
सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत जिल्हाधिकाºयांकडे बैठक झाली. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याने विमान प्राधिकरणाला ८ महिन्यांपूर्वी पर्यायी जागा सूचविण्याबाबत पत्र दिले होते.
संदर्भात बैठकाही झाल्या. यानंतर ७ मार्चला विमान प्राधिकरणाने कारखान्याला उत्तर कळविले. प्राधिकरणाच्या वेबसाईटवर यासंदर्भातील निकष दिलेले आहेत. हे निकष तुम्हीच तपासा आणि योग्य त्या ठिकाणी चिमणी उभारा, असे या उत्तरात म्हटले होते. प्राधिकरण स्पष्टपणे यात मदत करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांच्यामार्फत प्राधिकरणाकडून चिमणीची नेमकी जागा निश्चित करण्याचे ठरले. जागा निश्चित झाल्यानंतर कारखान्याने कामाला सुरुवात करायची आणि सध्याची चिमणी स्वत:हून हटवायची आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रतिसादच्सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय मंत्रालय स्तरावर जाण्याऐवजी यातील संभ्रम दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. गेल्या काही दिवसात चिमणीच्या प्रश्नावरुन कारखान्याच्या संचालक मंडळाला धारेवर धरण्यात आले होते; मात्र आता कारखान्याच्या संचालक मंडळाने पर्यायी चिमणी उभारण्याची तयारी करीत असताना प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.