सोलापूर : चादरीच्या शहराने वस्त्रोद्योगातही प्रगती साधली आहे. विशेषत: सण, उत्सवातही या वस्त्रोद्योगाने योगदान दिले आहे. गौरीगणपतीला लागणारे देवांचे वस्त्रही कलाकुसरीने तयार केले जात आहेत. महालक्ष्मीसाठी नऊवारीत काष्टा साडी, राजाराणी साडी, कोल्हापुरी आणि साधा काष्टासाठी अशी वस्त्रे बवली असून भोवतलाच्या जिल्ह्यांना ती भूरळ घालताहेत. ही वस्त्रं यंदा कोल्हापूरसह मराठवाडा आणि कर्नाटकात गेली आहेत.
महालक्ष्मीची ही तयार वस्त्रे सात इंच ते तीन फूट आकारात असून साध्या आणि सोप्या पद्धतीने देवीच्या अंगावर चढवता येतात, उतरवताही येतात. जुन्या फौजदार चावडी परिसरातील श्रीदेवी पाटील आणि त्यांच्या कुटूंबाने या वस्त्रातून त्यांनी दडलेली कलाकुसर दाखवली आहे. कोल्हापूर, बीड, अमेरिका, औरगांबादसह कर्नाटकातून देवीच्या या वस्त्रांना मागणी झाली आहे. १२ कलरच्या साड्यांमध्ये देवीचे वस्त्रं बनवली जाताहेत. इरकल, पैठणी, शालूच्या कापडातूनही ही वस्त्रं बनवली जाताहेत.