पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष संजय सोनवणे यांनी उजनी धरण तरटगांव हद्दीतील गेट समोर ३ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी मंजुरी मिळाली होती, नंतर ती रद्द करण्यात आली. त्याचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
शिवाय उजनी धरणातून मराठवाड्यासाठी जाणारा पाण्याचा बोगदा (मार्ग) हा तत्काळ बंद करण्यात यावा. उजनी धरणामध्ये मराठवाड्यासाठी २१ टीएमसीची तरतूद व चालू असलेले ७ टीएमसी पाणी तत्काळ रद्द करण्यात यावे, अशा अग्रणी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
या आंदोलनास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, तरटगांवचे उपसरपंच दादासो भांगे, दत्तात्रय सरडे, तरटगांवचे माजी उपसरपंच संजय संभाजी सोनवणे, कांदलगांचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश पाटील, संजय सोनवणे, महेंद्र बाबर, धनंजय तांबिले, राजेंद्र सोनवणे, विजय सोनवणे, नितीन ननवरे, वामन सोनवणे, दस्तगीर नायकुडे, सचिन सोनवणे, भारत सरडे, आदींनी उपस्थिती लावत आपला पाठिंबा दर्शविला.