मोहोळ : मागच्या वर्षी साडेचार लाख रुपये खर्चून केळीची बाग फुलवली. मात्र, उत्पन्न केवळ सात हजार रुपये आले. चालू वर्षी उसाचे बिल उशिरा आले अन् सावकाराचे कर्ज वाढले. वैतागलेल्या शिरापूर (ता. मोहोळ) मधील बळिराजाच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. मात्र, त्याने प्रश्न सुटणार नसल्याने या शेतकऱ्याने चक्क गांजा लागवडीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागितली.
अनिल आबाजी पाटील असे त्या शेतकऱ्याचे नाव असून, २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी लेखी अर्ज केला आहे. पाटील यांची शिरपूर येथे दोन एकर शेतजमीन आहे. सध्या कोणत्याही पिकाला शासनाकडून हमीभाव मिळत नाही. मशागतीचा खर्चदेखील निघत नाही.
साखर कारखान्याला घातलेल्या उसाचे बिलदेखील वेळेवर मिळत नाही. सावकाराचे कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्या करण्यापेक्षा कमी खर्चात जादा उत्पन्न देणारे पीक म्हणून दोन एकरात गांजाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अर्ज केला. १९ सप्टेंबरपर्यंत परवानगी न दिल्यास परवानगी मिळाल्याचे गृहीत धरून गांजाची लागवड करणार आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
या सुपीक कल्पनेतून केेलेली मागणी जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
--
अन् आत्महत्येचा निर्णय बदलला...
आजपर्यंत शेतीला बसलेला फटका पाहता पाटील हे हातात दोरी घेऊन आत्महत्या करण्यासाठी शेतात गेले होते. परंतु पुन्हा मनात विचार आला, आत्महत्या केल्यावर लोक काय म्हणतील ? मुलं काय म्हणतील ? पुन्हा विचार बदलला. कमी खर्चात जादा उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतात गांजा लावायचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे परवानगी मागितली.
----
साडेचार लाख खर्चले.. मिळालं साडेसात हजारांचं उत्पन्न
- संबंधित शेतकऱ्यानं यापूर्वी दोन एकरात अनेक पिकं घेतली. मात्र कोणतीच लाभदायी ठरली नाहीत. तोटा सहन करावा लागला. गतवर्षी तब्बल साडेचार लाख रुपये खर्चून केळीची लागवड केली. त्यातही इनमिन ७५०० रुपये उत्पन्न मिळालं. अखेर निराश होऊन मी गांजा लागवडीची मागणी केल्याचे अनिल पाटील या शेतकऱ्यानं सांगितलं.
-----
फोटो : २६ अनिल पाटील