सोलापूर : वय झाल्याने हातापायाने काम करता येत नाही. पाणी सोडलं तर चहापासून जेवणापर्यंत सर्वच गोष्टींसाठी सून अन् मुलाकडे बघावे लागते. सून लवकर जेवायला देत नाही म्हणून बाहेर नातेवाईकांकडे गेलं तर मुलगा शिवीगाळ करतो. अशा प्रकारच्या तक्रारी छळ होणाऱ्या वृद्धांकडून महिला समस्या तक्रार निवारण केंद्रात दाखल झाल्या आहेत.
वृद्धत्वासोबत बालपणही येते असे म्हणतात ते खरे आहे. वृद्धापकाळात कळत नकळत त्यांच्याकडून चुका होतात; मात्र या चुका समजून घेण्याची कुवत आजच्या पिढीमध्ये अभावानेच दिसून येत आहे. त्यामुळे या पिकल्या पानांना कधी सुने विरुद्ध तर कधी आपल्याच मुलाविरुद्ध पोलीस ठाण्याचे दार ठाेठवावे लागते. लग्न झाल्यानंतर मुलगा व सून यांचा संसार सुरू होतो, त्यामध्ये सासू-सासरे यांना काही खटकल्यास वाद निर्माण होतो. राग मनात धरून सून सासू किंवा सासऱ्याला व्यवस्थित बघत नाही. जेवण वेळेवर देत नाही, नवरा, बायको व मुलांना वेगळे जेवण अन् वृद्ध सासू सासऱ्याला साधं जेवण असे प्रकार घडतात.
घरातील धोरणात्मक निर्णयामध्ये सासू सासऱ्यांचं काही चालू द्यायचं नाही. पत्नीने पतीकडे तक्रार केली की मुलगा आई-वडिलांना मारहाण करण्यास कमी करत नाही. शेवटी पोटचा गोळा आहे म्हणून निमुटपणे अन्याय सहन केला जातो; मात्र अन्याय हाताबाहेर गेल्यानंतर मात्र पोलिसांकडे धाव घेतली जाते.
सून अपमान करते हातही उगारते
घरात सासू सासऱ्यांचं काही चालू द्यायचं नाही. त्यांच्या मध्ये काय बोलले तर सून प्रसंगी सासू, सासऱ्यावर हात उगारते. अनेक घरांमध्ये मुलगा आईला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. सून सासूला मारल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुलगा वडिलाला शिवीगाळ करतो, प्रसंगी मारतो अशाही तक्रारी दाखल झाल्या आहेत.
समुपदेशनाने ५० टक्के प्रकरणे मिटवली
महिला तक्रार निवारण केंद्रात वृद्ध आई-वडिलांच्या तक्रारी दाखल होतात. संबंधित मुलगा, सून किंवा अन्य नातेवाईकाला कक्षामध्ये बोलावले जाते. समोरासमोर बसवून अडचणी जाणून घेतल्या जातात. दोघांनाही समज दिली जाते, तरीही वृद्धांवर अन्याय केला तर कायद्याने गुन्हा दाखल केला जाईल ताकीद दिली जाते. या प्रकारातून ५० टक्के प्रकरणे मिटवली जातात. समजून न घेणाऱ्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्यास सांगितले जाते.
पाच वर्षांत वृद्धांच्या तक्रारी
- २०१७- १६
- २०१८- १२
- २०१९- १८
- २०२०- ०८
- २०२१ - १३
वृद्धांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेतली जाते. संबंधितांना बोलावून समजून सांगितले जाते. शक्यतो प्रेमाने वाद मिटवतो, नसेल तर संबंधित पोलीस ठाण्याला कळवून गुन्हा दाखल करण्यास सांगतो.
- ज्योती कडू, सहायक पोलीस निरीक्षक, महिला समस्या तक्रार निवारण केंद्र