दीपक दुपारगुडे, सोलापूर : रस्त्याच्या कडेला विश्रांतीकरिता थांबलेल्या वाहनांची टाकी फोडून डिझेल पळवणाऱ्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या टोळीतील एकाला करमाळा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे रात्रीच्या वेळी अहमदनगर - करमाळा रोडलगत थांबलेल्या कंटेनरमधून डिझेलची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली होती.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या मागावर राहिले. आरोपी हे पोलिसांना पाहून स्वत:च्या वाहनातून पळून जात होते. पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करून पकडले. पाच तासातील या कारवाईत टोळीतील आरोपी सापडला. त्यास अटक केली असता त्यांच्या टोळीतील इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. पथक उर्वरित आरोपींच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार (एम.एच.२३/ ए. डी. ४३५८) आणि वाहनातून काढलेले ४५ लिटर डिझेल, प्लास्टिक कॅन, प्लास्टिकचा बांगडी पाईप, डिझेलची टाकी फोडण्यासाठी बनवलेले हत्यार आदी जप्त करण्यात आले आहे.