सोलापूर/अक्कलकोट : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा पूजन ज्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, ते वैदिक पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित हे मूळचे जेऊर (ता. अक्कलकोट) येथील आहेत. जेऊरच्या ग्रामस्थांनी वाराणसीला जाऊन शुक्रवारी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे चिरंजीव सुनील दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित कुटुंबीय हे बाराव्या पिढीच्या आधीपासून काशी येथे वास्तव्यास आहेत. कोल्हापूर येथील त्यांचे हवाई दलात सेवानिवृत्त असलेले काका विश्वनाथ मथुरानाथ दीक्षित यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही दीक्षित कुटुंबीय हे जेऊरचे असल्याचे सांगितले. मूळ वास्तव्याच्या तळाची माहिती घेत असताना जेऊरचे नाव पुढे आले आणि त्यानुसार आम्हाला जेऊर हे आमचे पूर्वजांचे मूळ गाव असल्याचे समजले. आमचे कुलदैवत अंबाजोगाई येथील योगेश्वरीदेवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मूळ गावी भेट देण्याचे आश्वासन रामलल्लांच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या कुटुंबीयांची वाराणसी येथे भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना जेऊरचे महात्म्य सांगितले. यावेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी जेऊरच्या काशिलिंगाच्या पवित्र स्थानी म्हणजेच त्यांच्या मूळ गावी येऊन भेट देण्याचे निश्चित केले आहे.-मल्लिकार्जुन पाटील, अध्यक्ष, श्री काशिलिंग देवस्थान कमिटी, जेऊर.
पुरोहित वैदिक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचा सन्मान करताना बमलिंग महास्वामी, मल्लिकार्जुन पाटील, इरण्णा कणमुसे, खंडप्पा वग्गे, शिवराज बोरीकरजगी, विश्वनाथ नळगे आदी.