महेश कोटीवाले
वडवळ : शिक्षण फक्त पाचवी... पत्नीचे शिक्षण फक्त चौथी... शेती तीन एकर... पारंपरिक शेती करत विविध जोडधंदे करण्याचा प्रयत्न केला; मात्र म्हणावे असे उत्पन्न निघतच नव्हते... नंतर दीड एकरात पेरूची बाग करण्याचा प्रयोग केला हाच प्रयोग शेवटी यशस्वी झाला... याच पेरूमुळे मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शेतकरी बाळू कोळी व सविता कोळी यांना कष्टाचे दिवस काढत आता गावात स्वत:चे हक्काचे घर देखील बांधता आले... पेरूमुळेच त्यांचे आयुष्य गोड झाले.
घरची एकूण तीन एकर शेती... पाच वर्षांपूर्वी भोसे ता. पंढरपूर येथील दिवंगत शेतकरी बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीड एकर क्षेत्रात केरळ येथून ‘सरदार’ जातीची पेरूच्या रोपांची बाग केली. एक रोप १०० रुपयाला पडले. एक एकरात १५ ते २० फुटावर एक रोप लावले. दीड बाय दीडचा खड्डा घेऊन त्यात शेणखत, मुरूम टाकून रोपे लावली. दोन वर्षांत पूर्ण झाडांची वाढ झाली व मग उत्पन्न सुरू झाले.पेरूवर पाने व शेंडे कुरतडणाºया अळीचाच फक्त त्रास. इतर कोणत्याही रोगाला बळी न पडणारी ही पेरूची जात त्यामुळे वेळोवेळी अशा अळीचा बंदोबस्त केला, त्यामुळे हमखास उत्पन्न मिळू लागले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही रोपे लावल्यानंतर त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा यासारखी आंतरपिके देखील घेतली त्यामुळे खर्च देखील वाचला. सध्या देखील गहू हे आंतरपीक असून १० ते १२ पोती गहू निघेल असा विश्वास कोळी यांनी बोलून दाखवला. फक्त सुरुवातीलच केवळ चार मजूर लावून खड्डे घेणे, रोपे लावणे एवढाच मजुरी खर्च गेला नंतर मात्र या पती-पत्नीनीच संपूर्ण बाग हाताळली. पाणी देणे, पेरू तोडणे यासाठी कोणतेही मजूर न लावता हे काम सुरू आहे.
एका वर्षात दोन वेळा हे फळ येते... - सलग तीन महिने हे पेरूचे फळ मिळते...रोज किमान ४ कॅरेट पेरूचा माल निघतो. एका कॅरेटमध्ये साधारण १५ किलो माल बसतो. वर्षभरात एकूण जवळपास ८०० कॅरेट माल निघतो. कमीत कमी ३० ते जास्तीत जास्त ४० रुपयांपर्यंत आजवर भाव मिळाला असून, वडवळ गावात कधीकधी किरकोळ विक्री तर कॅरेटमधून सोलापूर येथे हा माल विक्रीस पाठवण्यात येतो.
निसर्ग त्याच्या पद्धतीने वाटचाल करीत असतो; मात्र शेतकºयांचे जीवन याच निसर्गावर अवलंबून आहे. याचाच विचार करून पेरू हे कमीत कमी रोगाला बळी पडणारे व हमखास उत्पन्न देणारे फळपीक आहे. त्याला आंतरपिकांची जोड देत आमची देखील वाटचाल सुरू आहे. - बाळू कोळी, शेतकरी वडवळ