अरुण लिगाडे
सांगोला : लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात कटफळ औटपोस्ट पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना अचानक आकाशातून खाली कोसळलेल्या जखमी माळढोक पक्ष्यास उचलून तत्काळ उपचारास मदत केली. त्या पक्ष्याचा जीव वाचवून माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. हा प्रकार महुद बु।। (ता. सांगोला) येथील मुख्य चौकात शुक्रवारी पाहावयास मिळाला.
कटफळ औटपोस्ट सपोफौ सुरेश पाटोळे, पो.ना. मेजर गोरख लोखंडे असे दोघे मिळून लॉकडाऊन व संचारबंदीच्या अनुषंगाने शुक्रवारी सायं. ५ च्या. सुमारास महुद (ता. सांगोला) येथील चौकात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अचानक आकाशातून एक पक्षी तडफडत खाली पडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ जखमी अवस्थेत त्या पक्ष्यास उचलून पक्षीमित्र दीपक धोकटे यांना बोलावून घेतले.
पोलिसांनी जखमी अवस्थेत त्या पक्ष्यास महुद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले. त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल धुमाळ यांनी तपासणी केली असता हा माळढोक पक्षी असून कोणीतरी दगड मारल्याने त्याच्या पंखाला जखम झाल्याचे दिसून आले. डॉ. धुमाळ यांनी त्याच्यावर तत्काळ औषधोपचार केल्याने काही वेळातच तो पायावर उभा राहिला. उपचारकामी परिचर विलास होळकर यांनी मदत केली. सपोनि पाटोळे यांनी वनविभाग कर्मचारी पारसे व शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.