सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात माणसाबरोबर सर्वांत जास्त उपासमार कोणाची झाली असेल तर ती भटक्या श्वानाची...ऐरवी हॉटेल, खाणावळी, चाइनीज सेंटर ते स्नॅक्स सेंटरमधून मिळणारे खाद्य बंद झाल्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या मुक्या प्राण्यांसाठी प्राणिप्रेमींनी स्वखर्चाने खाण्या-पिण्याच्या सोय करून दिल्यामुळे माणुसकी जिवंत आहे याचे दर्शन घडते आहे.
माणूस भूक लागल्यास जेवण मागून घेतो, पण रस्त्यावरील मोकाट श्वानास बोलता येत नसल्याने त्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाही.रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरही उपासमारीची वेळ आली आहे, भावना लक्षात घेऊनच मुक्या प्राण्यांच्या मदतीला कांही प्राणिमित्र धावले आहेत.
सोलापुरातील प्राणिमित्र बाळकृष्ण गोरे, अमित येवलेकर आणि शिंदे या प्राणिमित्रांनी पुढाकार घेत आपापल्या परिसरातील रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना पाव, भात, दूध, भाकरी, भुसा आणि पाणी देण्याचे काम करत आहेत. ते सकाळी ८ ते सकाळी ६.३० आणि सायंकाळी ७ ते ८ यावेळेत अशा दोन शिफ्टमध्ये जनावरांना खाऊ देण्याचे काम सुरू आहे.
५२५ मुक्या प्राणी-पक्ष्यांची सोय
सोलापूर शहरातील ४०० भटकी कुत्रे, ७० कावळे, २५ मांजर, १० गायी, २० खारुताई यांच्या दोन वेळची खाण्या-पिण्याच्या सोय केली जात आहे. या यासोबत शहरातील जवळपास एक हजार मुक्या प्राण्यांना अन्न देण्याचे काम केले जात आहे. रखरखत्या उन्हात पक्ष्यांची पिण्यासाठी भटकंती होते. अशा पक्ष्यांसाठी फिडर आणि पाण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे.
काय म्हणतात प्राणिमित्र
नागरिकांनी घरात शिल्लक राहिलेले अन्न, खाद्य कचऱ्यात न टाकू नये, आपल्या घराशेजारी बाहेर ठेवावे जेणेकरून मुक्या प्राण्यांच्या खाण्याची सोय होईल आणि त्यांची उपासमार थांबेल
- अमित येवलेकर, प्राणिमित्र
भटकी श्वान आणि सर्व प्राणी मात्र दुकाने हॉटेल्स बंद असल्यामुळे अन्न व पाण्याच्या शोधात फिरत आहेत. आपल्या घरात राहिलेले शिल्लक अन्न मुक्या प्राण्यासाठी द्यावे, पुणे, मुंबई शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांसाठी शेल्टर आहेत याच धर्तीवर सोलापुरात शेल्टर उभारणे गरजेचे आहे.
- बाळकृष्ण गोरे, प्राणिमित्र