सोलापूर : बार्शी तालुक्यातील गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पत्ते खेळत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तणावात असताना हे कर्मचारी मात्र मजेत असल्याचे चित्र पाहून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
भालगाव येथील तरुणांच्या ग्रुप वर गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पत्ते खेळत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबाबत बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी जोगदंड यांना विचारले असता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्याकडे फोटो पाठवण्यात आले आहेत, याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडे मी विचारणा केली आहे हे फोटो पूर्वीचे असल्याचे कर्मचारी सांगत आहेत, तरीही खबरदारी म्हणून पोलीस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना याबाबतची माहिती दिली आहे.
पोलिसांनी गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केलेली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागितल्याचे ही त्यांनी सांगितले सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते फोटो कधीचे आहेत याची खातरजमा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आजचे असतील तर याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा डॉ. जोगदंड यांनी दिला आहे.