आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनी तातडीने पक्षाची बैठक बोलाविली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. मात्र याचवेळी संतप्त झालेल्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने घाईघाईत पक्ष कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला.
रविवारी दुपारी अजित पवार यांनी ४० आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला. अजित पवारांना पाठिंबा देणारे लोक आनंदोत्सव साजरा करू लागले तर पक्षाध्यक्ष शरद पवारांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडू लागले. सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत शहराध्यक्ष भारत जाधव व पदाधिकारी यांनी शरद पवारांच्या पाठीशी राहण्याचा ठराव केला. यावेळी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी संतप्त होत शहर कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढण्याची मागणी केली, तरुणांची आक्रमकता पाहून अजित पवारांचा फोटो काढण्याची नामुष्की पदाधिकाऱ्यांवर आली.
यावेळी माजी महापौर जनार्दन कारमपुरी, शंकर पाटील, मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड, प्रशांत बाबर, बिज्जू प्रधाने, चंद्रकांत पवार, दिपक राजगे, सुभाष डांगे, सुनीता रोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.