जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे शनिवारी दुपारी कुर्डूवाडी येथील माढा पंचायत समितीच्या कार्यालयात अचानक तपासणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी येथील सर्व विभागाचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी बालविकास प्रकल्प, आरोग्य, रोजगार हमी योजना, शिक्षण,जिल्हा परिषद बांधकाम विभागाबरोबर सर्व विभागाची धावती आढावा बैठक घेतली.
याबरोबर रोजगार हमी योजनेतून विविध कामे घेण्यासंदर्भात व घरकूल योजनेतील येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना यासंदर्भातही मार्गदर्शन केले.
घरकूल विभागांमध्ये जागा उपलब्ध नसणाऱ्या लाभार्थीच्या संदर्भात करावयाच्या प्रक्रियेसंदर्भातही मार्गदर्शन केले. तालुका सर्व कामात अग्रेसर असल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, उपअभियंता एस.जे.नाईकवाडी, उपअभियंता जी.एच. शेख, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी,गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात,प्रशासन अधिकारी सयाजी बागल आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पंचायत समितीच्या अद्ययावत इमारतीची पाहणी केली. जवळच्या सभागृहात सुरू असलेल्या आरोग्य विभागाच्या लसीकरण संदर्भातील प्रशिक्षणाला भेट दिली.
फोटो ओळ-
माढा पंचायत समितीत सर्व विभागप्रमुखांंची आढावा बैठक घेताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील व विभागप्रमुख.
-----