राऊत मळा (सांगोला) येथील योगेश बाईलभिंगे यांचे सांगोला-मिरज रस्त्यावर गणराज म्युझिक अँड कार ॲक्सेसरीजचे दुकान आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अरविंद भगवान बनकर (रा. सांगोला) याने त्याच्या पिकअपला सदर दुकानातून उधारीने पाच हजार रुपयांचे शोचे साहित्य बसून घेतले होते. मंगळवारी योगेशने अरविंद बनकर याला फोन करून पैसे मागितले असता त्याने ‘तू गावरान तडका हॉटेलमध्ये ये, तेथे तुला पैसे देतो,’ म्हणून बोलावून घेतले. यावेळी योगेश बाईलभिंगे व प्रवीण राऊत हे दोघे त्या हॉटेलमध्ये गेले. त्याने पैसे मागताच अरविंद बनकर यांनी त्या दोघांना जेवण सांगून थोडेतरी जेवण करा म्हणून जबरदस्तीने तिघांनी जेवण केले. त्यानंतर त्याने साहित्याचे बिल मागितले. यावेळी योगेशने आत्ता दुकान बंद केले आहे, मी तुला सकाळी बिल दाखवतो, असे बोलल्याने दोघांमध्ये किरकोळ भांडण लागले. त्यावेळी अरविंद बनकर याने रागातच ‘तुला लय मस्ती आली आहे, तुला आता बघतोच,’ असे म्हणून चाकूने योगेशच्या गळ्यावर सपासप मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हॉटेलमालक तानाजी गोडसे व प्रवीण राऊत यांच्यासमोर घडला. याबाबत योगेश बाईलभिंगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अरविंद भगवान बनकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पिकअप व्हॅनमालकाने केले दुकानदाराच्या गळ्यावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:22 AM