शिवानंद फुलारी
अक्कलकोट : महाराष्टÑाच्या नकाशावर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्कलकोट बसस्थानकाचे चित्र मात्र दुर्दैवी आहे. २० वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास निधीतून या बसस्थानकाच्या सोयीसुविधांबाबत तरतूद केली होती. मात्र आराखडा कागदावरच राहिला. ३५ किलोमीटरवर सोलापुरात परिवहन राज्यमंत्री सोलापुरात राहतात. मात्र त्यांनाही अक्कलकोटच्या बसस्थानकाच्या विकासाचा विसर पडावा, याबद्दल नागरिकांमध्ये खेद व्यक्त होत आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात-परदेशात आहेत. येथे येण्यासाठी महामंडळाच्या बस अथवा रेल्वेचा आधार घ्यावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक या शहरात आहे. मात्र देश-विदेशातून येथे येणाºया भक्त आणि पर्यटकांच्या मनात या ऐतिहासिक शहरातील बसस्थानकामुळे चुकीचे चित्र निर्माण होत आहे. या बसस्थानकाकडे कुणाचेच लक्ष नसल्याने हे समस्यांचे आगार झाले आहे. प्रवाशांची संख्या वाढली. मात्र सुविधा अपुºया असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी पाहता श्री क्षेत्र अक्कलकोटला अद्ययावत बसस्थानक होणे गरजेचे आहे. सध्या स्वामी नगरीत महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश या विभागासह कर्नाटक व गोवा, आंध्र या राज्यातील रा.प.म. बस येतात.
अक्कलकोट येथील महामंडळाचे माजी कर्मचारी तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर बसस्थानकाच्या धर्तीवर बांधकामाचा नकाशा तयार केला आहे. त्यास वरिष्ठांनी मंजुरी दिली होती. पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पोलीस ही संकल्पना देखील राबविण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी मंडळाच्या वतीने चालक व वाहकांकरिता विश्रांत कक्षाची निर्मिती केली. यामुळे राज्यातील चालक व वाहकातून समाधान व्यक्त होत आहे.
नुकतेच या विश्रांती कक्षास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी भेट दिली होती. राज्यात पुढील काळात चालक व वाहकांकरिता महामंडळाकडून बांधण्यात येणारे विश्रांती कक्ष हे अन्नछत्र मंडळाच्या पॅटर्नप्रमाणे असतील, असे त्यांनी सांगितले होते. विकास आराखडाच बाजूला ठेवल्याने तालुक्यासह बाहेरून आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
२० वर्षे लोटली तरी उपेक्षा कायमच
- - श्री क्षेत्र अक्कलकोटचे महत्त्व पाहता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बाबासाहेब तानवडे यांच्या कार्यकाळात तीर्थक्षेत्राचा दर्जा अक्कलकोटला दिला. त्यावेळी तीर्थक्षेत्र निधीत बसस्थानकाच्या सोयीसुविधांबाबत तरतूद केली होती. त्यानंतर आघाडीची १५ वर्षे व सध्या भाजप-सेनेची सरती पाच वर्षे अशी २० वर्षे लोटली तरी उपेक्षा मात्र कायम आहे. बसस्थानकाच्या विस्तारीकरण अथवा नूतनीकरणासाठी दमडीचाही निधी मिळाला नाही. डागडुजीसह विविध कंपन्यांच्या जाहिरातींंनी बसस्थानक गेल्या तीन दशकांपासून सजविण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या संख्येबरोबरच बसच्या फेºया वाढल्या. मात्र सुविधांची वानवाच आहे.
समस्याच समस्या
- - अक्कलकोट बसस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय, अपुरे स्वच्छतागृह, उपहारगृह, परिसरातील घाणीचे साम्राज्य, अपुरे फलाट, ध्वनिसंदेश यंत्रणेचा अभाव आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी येथे दिसतच नाही. वाहतूक नियंत्रक प्रमुख फक्त नावालाच असल्याने चौकशी कुठे करायची, असा प्रश्न पडतो. महामंडळाचे दुर्लक्ष असल्याने खासगी वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. पार्सल सुविधा नाही. बसस्थानकाकडे जागा असली तरी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने विकास थांबला आहे.