पंढरपूर : येथील एका हॉस्पिटलमधून एका तरुणाचा मोबाईलचा गायब झाला होता. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोबाईल पळवणार्यांचे हावभाव पाहून चार तरुणांनी शहरातील दारू मिळणाऱ्या ठिकाणांसह भिक्षेकरी असलेली ठिकाणेही पालथी घातली व मोबाईल पळवणार्या व्यक्तीस शोधून काढले.
या शोध मोहिमेत एका पोलिसाच्या मुलाचाही सहभाग आहे. इसबावी (पंढरपूर) परिसरातील ज्ञानकांचन हॉस्पिटलमध्ये वैभव गणेश जगदाळे ( रा. अक्षत बंगलोज) यांचा ३८ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने पळविला. ही घटना शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडली.
याबाबतचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणातील व्यक्तीचे हावभाव पाहून, मोबाईल पळवणारा व्यक्ती भटकंती करणारा आहे. असा अंदाज वैभव गणेश जगदाळे व त्याचे मित्र अनिकेत गणेश जगदाळे, शुभम शिवदास सरडे, ओंकार तानाजी पवार ( खेडभोसे) यांनी बांधला. मोबाईल पळवणाऱ्या व्यक्तीचा दारूचे अड्डे, शिव भोजनालय, बेघर निवास, चंद्रभागा वाळवंट, बसस्थानक या ठिकाणी शोध घेतला. सर्वत्र फिरून हे तरुण कंटाळले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तर सीसीटीव्ही च्या चित्रीकरणतील वर्णनाचा व्यक्ती त्यांना रेल्वे स्टेशनवर आढळून आला. त्या व्यक्तीला त्यांनी विचारले असता प्रथम त्याने मी मोबाईल घेतला नाही, असे सांगितले. परंतु तुला पोलिसांसमोर हजर करतो असा दम दिल्यानंतर मी तुमचा मोबाईल देतो पण मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, असे उत्तर दिले. यानंतर चारी तरुणांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
भिक्षेकरीही झाले ओळखीचे
मोबाईल शोधण्यासाठी चंद्रभागा वाळवंट याठिकाणी आम्ही गेलो होतो. मोबाईल चोरास शोधण्यासाठी गेल्यानंतर आमची भिक्षेकरी, बेघर व अन्य लोकांचीही चांगली ओळख झाली. त्यांनी माझा मोबाईल घेतला व अशा वर्णनाचा व्यक्ती आढळून आल्यास तुम्हाला कळवतो म्हणून आम्हाला सांगितले, अशी माहिती शुभम शिवदास सरडे यांनी दिली.