अरुण लिगाडे सांगोला : घेरडी (ता. सांगोला) येथील श्याम पेट्रोल पंपावरील सुमारे २ लाख १६ हजार रुपये रोकड चोरी प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या १० तासाच्या आत छडा लावून चोरीचा पर्दाफाश केला. फिर्यादी हर्षद गजानन सोनवणे (रा. घेरडी) यानेच चोरीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी हर्षद सोनवणेला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले सुमारे २ लाख १६ हजार रुपये हस्तगत केले आहेत. सदर आरोपीस गुरुवार २३ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.
डोक्याला कान टोपी व तोंडाला रुमाल बांधून स्कार्पिओ जीप मधून आलेल्या अज्ञात चौघांनी पेट्रोल पाहिजे असे म्हटले. तसेच यानंतर पंपावरील कामगाराच्या गळ्याला चाकू लावून लाॅकर मधून सुमारे २ लाख १६ हजार रुपयेची रोकड लुटून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती. याबाबत , कामगार हर्षद गजानन सोनवणे रा घेरडी यांने पोलिसात चौघाविरुद्ध फिर्याद दिली होती. दरम्यान, घटनेची माहिती व फिर्याद घेऊन सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप पोलीस पथकासह शाम पेट्रोल पंपावर दाखल झाले.
यावेळी पोलिसांच्या पथकाने फिर्यादी हर्षद सोनवणे व कामगार चैतन्य सरगर यांच्याकडे वेगवेगळी सखोल चौकशी केली. यावेळी हर्षद कडे विचारपूस केल्यानंतर तो बुचकळ्यात पडला व त्यानेच प्लॅन करून चोरीचा बनाव केल्याचे कबुली दिली. तर कामगार चैतन्य सरगर यांने सदर कॅश चोरीचा प्रकार घडला नसून तो हर्षदने बनाव केल्याचे सांगितले. पेट्रोल पंपावर चोरलेले सुमारे २ लाख १६ हजार रुपये हर्षद सोनावणे त्याच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पुरून ठेवले होते व कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याच्यावर गवत टाकले होते. पोलिसांनी पंचा समक्ष सदर रोकड हस्तगत केली आहे. ही कामगिरी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप पीएसआय शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण गोलेकर प्रकाश कारटकर, धनाजी गाडे ,अक्षय दळवे, मोहन मनसावाले, अक्षय डोंगरे चालक समीर शेख यांनी केली आहे.