सोलापूर : ऐन रंगपंचमी सणावेळी शहर व हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एकीकडे स्मार्ट सिटी एरियात दररोजच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे तर दुसरीकडे हद्दवाढ विभागाला वाºयावर सोडण्यात आले आहे.
उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शहरातील पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असतानाही पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हद्दवाढ भागात कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. चार दिवसांनी पाणी येते व तेही कमी वेळ यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी चार दिवस पाण्याचा साठा करून ठेवणे अवघड होत आहे. असे असताना पाणीपुरवठा अवेळी व कमी दाबाने केला जात आहे. पाणी कमी दाबाने येणार याची कल्पना दिली जात नाही.
मंगळवार, ६ मार्च रोजी रंगपंचमी असताना सोमवारी हद्दवाढ भागात ज्या विभागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात कमी दाबाने पाणी देण्यात आले. अशात पुन्हा सोमवारी टाकळी पंपगृहास वीज मंडळाकडून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून सणादिवशीही शहर व हद्दवाढ भागात पाणीपुरवठा उशिरा व कमी वेळ व कमी दाबाने होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरडा रंग खेळून सहकार्य करावे, असे मनपातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या गावठाण भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. इकडे मात्र हद्दवाढ भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकायची वेळ आली आहे. हद्दवाढ भागाचेही पाणी वितरणाचे नियोजन व्यवस्थित करावे, अशी मागणी नगरसेवक राजेश काळे यांनी केली आहे.----------------सोमवारी टाकळी, पाकणी आणि मेडिकल पंपगृहाचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. त्यामुळे पाण्याचा पुरेसा उपसा न झाल्याने शहर व हद्दवाढ भागात पाणीपुरवठा वेळेवर झाला नाही. मंगळवारीही हीच परिस्थिती राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- गंगाधर दुलंगे, सार्व. आरोग्य अभियंता