सांगोला : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील सहा मध्यम व लघू प्रकल्पात ७६१ (१२६ टक्के ) दलघफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. २८ फेब्रुवारीनंतर उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ (मध्यम) व चिंचोली, जवळा, अचकदाणी, हंगिरगे व घेरडी या सहा मध्यम व लघु पाटबंधारे विभागाच्या तलावात सोमवार १५ फेब्रुवारी अखेरी एकूण ७६१ दलघफूट पाणीसाठा उपलब्ध आहे.
त्या - त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतक-यांच्या मागणीनुसार आवर्तन (पाणी ) सोडले जात आहे. शेतक-यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तनाचे नियोजन मार्च महिन्यात केले जाणार आहे.
सांगोला तालुक्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाटबंधारे विभागाकडून बुद्धेहाळ मध्यम तसेच हंगिरगे घेरडी, जवळा ,अचकदाणी , चिंचोली या ठिकाणी लघु प्रकल्पाची निर्मिती करून त्या -त्या भागातील लाभक्षेत्र ओलिताखाली आणले आहे. सांगोला तालुक्यात नेहमीच कमी अधिक पर्जन्यमानामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे.
२८फेब्रुवारी नंतर रब्बी हंगाम संपून उन्हाळी हंगाम चालू होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतीला व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. पाण्याचे नियोजन करून शेती पिकांना पाणी दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तर म्हैसाळ योजनेतून घेरडी हंगिरगे जवळा तसेच नीरा उजवा कालव्यातून चिंचोली या तलावात पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन आहे. चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी पाणी वापर संस्था निर्माण केल्या आहेत. उन्हाळी पिकांबरोबरच फळबागांना पाण्याची मागणी वाढणार आहे. दरम्यान उद्या तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांकडून उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तनाची मागणी गृहीत धरून उपलब्ध पाणीसाठा मागणीचा विचार करता पुरेल इतका पाणीसाठा बुद्धेहाळ प्रकल्पात शिल्लक आहे. पाण्याची कमरता भासण्याची शक्यता निर्माण झाल्यास टेंभू योजनेतून भरून घेण्याचे नियोजन असल्याचे अभियंता एल.बी. केंगार यांनी सांगितले.
असा आहे पाणीसाठा
तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारे तलावातील उपलब्ध पाणीसाठा व टक्केवारी पुढीलप्रमाणे : बुद्धेहाळ- ५३० दलघफूट (७९ टक्के ), घेरडी - ६०.९३ दलघफू ( ७०:१७ टक्के ) हंगिरगे- १९. ८० दलघफूट (४२: ०८ टक्के ) , जवळा-३४ . ७८ दलघफू ( ७४:४९ टक्के ) अचकदाणी- ३६.२३ दलघफू (७५.९५ टक्के ) , चिंचोली -७९.७५ दलघफू (७३.८३ टक्के) असा पाणीसाठा उपलब्ध आहे.