सोलापूर : प्लास्टिक बंदीचा पहिला दिवस राज्यभर गाजविणाºया सोलापुरातील कारवाई आता मात्र थंडावली आहे. शासनाच्या दुसºया अध्यादेशामुळे ही शिथिलता आल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.
२३ जूनपासून प्लास्टिक बंदीचा अंमल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यावर महापालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीबाबत पहिल्याच दिवशी दहा पथकांद्वारे शहरात तपासणी मोहीम राबविली. पहिल्याच दिवशी ४६ व्यापाºयांवर प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्यात पहिली कारवाई सोलापुरातच झाली.
याशिवाय दिवसभरातील कारवाईत मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेचा क्रमांक लागला. एकाच दिवसात ६00 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर २४ दिवसात केवळ ९८ दुकानांवर कारवाई झाली. यात १३४७ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या तर दुकानदारांकडून ४ लाख ९0 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीस खाद्य विक्रेते, बेकरी आणि पॅकिंग वस्तू असणाºया व्यापाºयांचा विरोध झाला. त्यामुळे शासनाने नव्या अध्यादेशाद्वारे काही जणांना ५0 मायक्रॉनपेक्षा जादा जाडीचे प्लास्टिक रिसायकलिंगच्या अटीवर तीन महिन्यांसाठी शिथिलता दिल्याने कारवाई थंडावली आहे. सध्या बाजारात बेकरी, भाजी व फळ विक्रेत्यांकडे पुन्हा कॅरीबॅग दिसत आहेत. सुपर मार्केट, मॉल व किराणा दुकानात कापडी पिशव्यांचा आग्रह धरला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
अशी आहे सवलत...- दुकानात पूर्वीपासून पॅकिंग स्वरूपात असलेल्या पाव ते एक किलोपर्यंतच्या साहित्यावरचे प्लास्टिकचे आवरण काढण्यास शासनाने तीन महिन्यांची सवलत दिली आहे. यापुढे असे पॅकिंग ५0 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी असता कामा नये. प्लास्टिकचे रिसायकलिंग करण्याच्या अटीवर उत्पादनावर उत्पादक, विक्रेत्याचे नाव व प्रदूषण महामंडळाकडे नोंदणी केल्याचा परवाना क्रमांक असणे आवश्यक आहे.
पथकांवर जबाबदारी आहेच...- महापालिकेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी १0 पथके तयार केली आहेत. यामध्ये ४७ स्वच्छता निरीक्षक, ८ आरोग्य निरीक्षक, परवाना व इतर विभागाचे ८२ कर्मचारी असा हा ताफा असल्याची माहिती अन्न परवाना निरीक्षक दत्तात्रय आराध्ये यांनी दिली. कारवाईत शिथिलता दिसत असली तरी येत्या पंधरवड्यानंतर दुकानातील सर्व पॅकिंग तपासले जाणार आहेत. काही दुकानदारांनी प्रदूषण महामंडळाने परवाना दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. त्यात खाद्यतेल विक्रेत्यांचा समावेश आहे. पुण्याच्या के. के. प्लास्टिकने अशा जादा जाडीच्या पिशव्या पुरविण्यास सुरुवात केली आहे.