रुपेश हेळवे
सोलापूर : तसे बांबू हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते़ याचबरोबर बांबूला हिरवे सोने म्हणूनही एक वेगळी ओळख आहे़ काही वर्षांपासून बांबूपासून चटई ते सुपापर्यंत अनेक वस्तू बनविल्या जात होत्या, पण या उद्योगात प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे बांबूपासून तयार होणारी सर्व उत्पादने धोक्यात आली आहेत. सर्व वस्तूंची मागणी निम्म्यावर आली आहे़ पण बदलत्या काळानुसार व्यापाºयांनी आपल्यामध्ये बदल करून घेतले आहे़ यामुळे सोलापुरात तयार करण्यात येणाºया बांबूच्या उत्पादनाला राज्यभर मागणी आहे.
१८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बांबू दिन म्हणून साजरा केला जातो़ जगात बांबूच्या पंधराशे जाती आहेत. यातील १०० ते १५० जातींचे बांबू पीक भारतात घेतले जाते़ पण बांबूचे उत्पादन करण्यासाठी मोजक्याच जाती महत्त्वाच्या आहेत.
यामध्ये सोनकाठी, बोरबेट या प्रकारच्या बांबूने विविध वस्तू बनविल्या जातात़ साधारणत: पूर्वी बांबूपासून कुल्फीच्या काड्या, चटई, सूप, टोपली, दुरडी, हात पंखा, झाकण, करंडी, उदबत्तीच्या काड्या आदी वस्तू बनविल्या जात होत्या़ पण बदलत्या काळानुसार यांची जागा ही प्लास्टिकपासून बनविलेल्या वस्तंूनी घेतली.
यामुळे आता यातील काही वस्तू दिसत नाहीत़ पण पारंपरिक सण, उत्सावात मात्र बांबूच्या उत्पादनाला चांगलीच मागणी असते़ याचबरोबर धार्मिक कार्यक्रमासाठी मात्र हमखास बांबूपासून बनविलेल्या वस्तूच घेतल्या जातात.
यामुळे बांबूपासून विविध वस्तू तयार करणारेही आपल्यामध्ये बदल करून घेतला आहे़ तेही आता पारंपरिक वस्तूंसोबत फ्लॉवर पॉट, लॅम्प, टोपी, बादली, शोभेच्या व गृहसजावटीच्या वस्तू बनवत आहेत़ यामुळे काही प्रमाणात मात्र मागणी वाढली आहे.
उत्पादकांची मागणी- बांबूशेती व प्रक्रिया उद्योग फायदेशीर धार्मिक शास्त्रानुसार बांबू हा माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत लागणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज बदललेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू समाजातील सर्व घटकांसाठी फायदेशीर असून, हे सर्व पर्यावरणपूरक आहेत़. प्रदूषणात दिवसेंदिवस अमाप भर घालणाºया प्लास्टिकचे वाढते आक्रमण थोपवण्यासाठी एक चांगली मदत या माध्यमातून होईल़ याचबरोबर बांबू उत्पादकांनाही चालना मिळेल़ यासाठी बांबू उत्पादन वाढवण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. त्या उपाययोजनांची अंमलबजावणीही करण्यात यावी, अशी मागणी बांबू उत्पादकांकडून होत आहे.
शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून बांबूशेती व बांबू उद्योगास चालना व गती दिली आहे, ही समाधानाची बाब आहे़ बुरुड समाज हा मागास व अशिक्षित असल्यामुळे योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत़ समाजबांधवांनी पारंपरिक व्यवसायाची मानसिकता बदलून आर्थिक प्रगतीसाठी व स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन योजनांचा व आधुनिकतेचा विचार करणे ही काळाची गरज आहे.-दशरथ वडतिले, अध्यक्ष, सोलापूर शहर बुरुड समाज.
सध्या प्लास्टिकच्या विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत़ यामुळे बांबूपासून बनवण्यात येणाºया वस्तूंची मागणी अर्ध्यावर आली आहे़ यामुळे बदलत्या काळानुसार आमच्या वस्तूंमध्ये बदलही करण्यात आले आहेत. यामुळे बाजारात नवीन वस्तंूची मागणी वाढली आहे़ आम्ही तयार केलेले लॅम्प, शोभेच्या वस्तू राज्यभर विकल्या जात आहेत. पण या वस्तूंना खूप कमी दर मिळत असतो़ -ज्ञानेश्वर सुरवसे, व्यापारी