सोलापूर : खगोलशास्त्राच्या क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगणे तसे कठीणच असते. फक्त आकृतीच्या सहाय्याने केलेले विश्लेषण विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजतेच असे नाही. पण, हा विषय आनंददायी पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना समजावता येऊ शकतो. हे जाणूनच सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेत ‘मर्ज क्यूब’च्या सहाय्याने खगोलशास्त्राचे धडे देण्याचा प्रयोगशील उपक्रम घेण्यात येतो.
तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध संकल्पना सहजपणे समजण्यास मदत होते. त्याचबरोबर अध्यापनही आनंददायी होण्यास मदत होते. ‘मर्ज क्यूब’ या अॅपच्या माध्यमातून शाळेतील मुलांनी एका अनोख्या पद्धतीने सूर्यमाला हातात अनुभवली. प्रत्येक ग्रह, उपग्रह कसा फिरतो, कक्षीय गती, रंग आदी संकल्पना समजावून सांगितल्या जातात. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही उत्तरे देण्यात येतात. यासाठी चौकोनी आकाराच्या बॉक्सवर विशेष पद्धतीचा कागद चिकटविण्यात आलेला असतो. त्यावर मर्ज क्यूब अॅप स्कॅन केल्यास सूर्यमालेतील विविध ग्रहांचा अनुभव घेता येतो.
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना तंत्रज्ञानात होणाºया बदलांचा स्वीकार शाळेच्या शिक्षणपद्धतीत केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी कुतूहल, जिज्ञासा निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून चांद्रयान-२ चे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. याविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. शाळेत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांसाठी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सदस्य व्ही. बी. बºहाणपुरे, गुरुराज माळगे, डॉ. राजशेखर येळीकर, मल्लिकार्जुन कळके, भीमाशंकर पटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, शिक्षण समन्वयक संतोष पाटील यांचे मार्गदर्शन असते.
राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा हा पुरस्कार- विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच सर्जनशीलतेची कल्पकता वाढीस लागावी, श्रमाचे महत्त्व समजावे, कलात्मकता जोपासली जावी यासाठी विशेष उपक्रम शाळेत घेण्यात येतात. शाळेच्या भिंती रंगविणे, बाजारपेठ भेट, इको फ्रेंडली गणपती बनविणे, वृक्षारोपण, गंमत शाळा, वाचनालय भेट, युनेस्को क्लब यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळेच महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्याकडून शाळेला राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा हा पुरस्कारही मिळाला आहे.
‘कायकवे कैलास’ हे ब्रीदवाक्य असलेली पताका हाती धरुन भारतीय संस्कृती व आधुनिक संस्कृती यांचा दुहेरी संगम साधून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. एक सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे काम सिद्धेश्वर बालक मंदिर येथे करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून आहारतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. - गीता चिकमणी, मुख्याध्यापिका, श्री सिद्धेश्वर बालक मंदिर.