- शीतलकुमार कांबळेसोलापूर - पोलीस भरतीसाठी आलेल्या युवक युवतींना तात्पुरत्या स्वरूपात नेहरू हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आषयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
सध्या सोलापूर शहरांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी मुले व मुली ग्रामीण भागातून व इतर जिल्ह्यातून येत आहेत. सोलापुरात सध्या पावसाचे वातावरण असल्या कारणामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांच्या मुक्कामाची सोय नेहरू होस्टेल येथे करावी अशा स्वरूपाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, रोहन माने, रमेश चव्हाण, फिरोज सय्यद, आप्पासाहेब लंगोटे, रविकांत शिनगारे, शेखर चौगुले आदी उपस्थित होते. मैदानात झोपण्याची वेळभरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे सोलापूर शहरांमध्ये नातेवाईक नसल्यामुळे काही उमेदवार हे मैदानात झोपतात. पण, शहरात रोज पाऊस पडत असल्याने पैसे देऊन राहणे त्यांना परवडत नाही. सध्या नेहरू वसतिगृह रिकामे असून अशा उमेदवारांना नेहरू वसतिगृहात प्रवेश पत्र दाखवून तात्पुरत्या स्वरूपात पर्याय उपलब्ध करून द्यावा. रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत राहणे व बाथरूम सोय व्हावी ही मागणी करण्यात आली आहे.