सांगोला : मुलाने चोरलेल्या अर्धा किलो सोन्याच्या मोबदल्यात त्याच्या पित्याकडून तीन एकर जमीन जबरदस्तीने खरेदी करण्याचा घाट पोलिसांनी हाणून पाडला. अपहरणकर्त्या एका सराफ पिता-पुत्राला बुधवारी सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात अटक केली.
कैलास संभाजी जरे आणि संभाजी पांडुरंग जरे ( कौठोळी, ता. आटपाडी) असे अटक केलेल्या पिता-पुत्राचे नाव असून, या दाेघांना गुरुवारी सांगोला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी पाटील यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात दोन अनोळखी व्यक्ती फरार असून, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तानाजी कोळेकर (रा.जुनी लोटेवाडी) यांचा मुलगा संतोष कोळेकर हा प्रकाश जरे यांच्या बिदर (कर्नाटक) येथील दागिन्यांच्या दुकानातून काम करतो. दरम्यान, अर्धा किलो सोने चोरल्याचा आरोप सांतोषवर झाला. येथील कैलास संभाजी जरे व संभाजी पांडुरंग जरे हे पिता-पुत्र ३१ मार्च रोजी जुनी लोटेवाडी संतोषच्या घरी आले. कोळेकर हे दाम्पत्य घरात झोपले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास जरे पितापुत्र येथे आले. तानाजी यास झोपेतून उठवत तुझा मुलगा संतोष याने सोने चोरले आहे, तू आमच्याबरोबर गाडीत बस...असा दम दिला. जरे पिता-पुत्रांसह इतर दोन अनोळखी व्यक्तींना तानाजी यास मारहाण करीत अपहरण केले. त्यावेळी जरे पिता-पुत्रांनी सुरेखा कोळेकर यांना सोने द्या, नाहीतर तुमची जमीन लिहून द्या, त्याशिवाय तानाजी व संतोष या दोघांना सोडणार नाही, अशी धमकी दिली.
याबाबत सुरेखा तानाजी कोळेकर (रा.जुनी लोटेवाडी) हिने पोलिसांत फिर्याद दिली.
सापळा लावला अन् दोघे अडकले
दरम्यान, हवालदार तानाजी लिंगडे हे तपास करीत होते. सुरेखा कोळेकर यांच्या नातेवाइकांकडून जरे पिता-पुत्र तानाजी कोळेकर यांची तीन एकर जमीन मुलाने चोरलेल्या अर्धा किलो सोन्याच्या मोबदल्यात बळजबरीने खरेदी करण्याचा घाट घातला. ते यासाठी बुधवारी सांगोल्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हवालदार तानाजी लिंगडे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या ठिकाणी सापळा लावला आणि तानाजी कोळेकर यांची जमीन खरेदी करण्यापूर्वी कैलास जरे व संभाजी जरे या पिता-पुत्रांना ताब्यात घेतले.