मोदीजी.. ये गरीब लोग आपको जिंदगी में कभी नही भूलेंगे !
२०२२ मध्ये मोदींच्या हस्ते होईल ३० हजार घरांचे लोकार्पण
माकपाच्या माजी आमदाराने केले पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशा शब्दात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली आणि पुढचे पंतप्रधान तेच असल्याचे सांगितले.
सोलापुरात कष्टकरी कामगारांच्या ३० हजार घरांचा प्रकल्प आडम मास्तर यांनी उभा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा पायाभरणीस समारंभ मोदी यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. यावेळी बोलताना आडम म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि आमचा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंजूर करून आणला. ‘ये छोटा घर गरीब के लिए बंगला ही है, अगर ये बनाने में सरकारने पुरा सहयोग किया तो ये गरीब लोग आपको मरे तक नही भुलेंगे’ असे आडम म्हणाले. यापूर्वीचा दहा हजार घरांचा प्रकल्प माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारजी वाजपेयी यांनी मंजूर केला आहे. आताचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करण्यास मदत केल्याचेही आडम म्हणाले.
पाच वर्षापूर्वी भाजपाच्या प्रचाराची सुरुवात मोदींनी सोलापुरातून केली होती. त्यावेळी मोदींना प्रचंड प्रतिसाद लाभला होता. आज पाच वर्षानंतर सरकार यशस्वी की अयशस्वी हे सांगणारे दोन प्रवाह असल्यामुळे मोदींच्या सभेची उत्सकुता सर्वांना लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सकाळी साडेनऊच्या आसपास सोलापुरात दाखल झाले.
पोलिसांनी सकाळपासून कडक बंदोबस्त लावला होता. सुमारे तीन हजार पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. शहरातील लकी चौक, सरस्वती चौक, रामलाल चौक या ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. तसेच इतर ठिकणाहून पार्क मैदानाकडे येणारे रस्ते सकाळी 10 वाजल्यापासून बंद करण्यात आले आहेत. मोदी दौऱ्याचा लवाजमा पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. मोदींनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहे असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हवेत फुगे सोडून निषेध करण्यात आला. शहरातील अनेक संघटनांनी मोदींना विरोध केल्यामुळे प्रमुख नेत्यांना पोलिसांनी नजरबंद ठेवले होते.