सोलापूर : कुंभारीच्या माळरानावर तीस हजार घरकूल प्रकल्प नियोजित आहे़ जानेवारी २०१९ मध्ये या तीस हजार घरकुलांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या हस्ते झाले़ लवकरात लवकर घरे पूर्ण करून चाव्या द्यायला पुन्हा सोलापुरात येणार असल्याचे ठोस आश्वासन मोदींनी दिले़ २०२० च्या दिवाळी दरम्यान पहिल्या टप्प्यात पाच हजार घरांचे वाटप नियोजित होते़ निधीअभावी आजघडीला फक्त साडेपाचशे घरांचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राकडून साडेचारशे कोटी रुपये निधी येणे अपेक्षित आहे़ केंद्राकडून अद्याप काहीच निधी न आल्याने निधीअभावी प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे़ त्यामुळे मोदी यांच्या गरिबांच्या घरांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कुंभारी येथे यापूर्वी दहा हजार कामगारांची वसाहत निर्माण झाली़ याच धर्तीवर संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील तीस हजार कामगारांकरिता कामगार वसाहत होत आहे़ तीस हजार पैकी साडेसोळा हजार घरांना मंजुरी मिळाली असून यातील सात हजार घरांचा पाया तयार झालेला आहे़ साडेसोळाशे घरांचा जोता पूर्ण झालेला आहे़ तर फक्त साडेपाचशे घरे पूर्ण तयार आहेत़ यातील प्रत्येक लाभार्थीस केंद्राकडून दीड लाख आणि राज्य सरकारकडून एक लाखाचे अनुदान मिळणार आहे.
लाभार्थींना अडीच लाखात पक्के घर मिळणार आहे. याकरिता केंद्राकडून साडेचारशे कोटी आणि राज्य सरकारकडून तीनशे कोटींचा निधी मिळणार आहे़ आतापर्यंत राज्य सरकारकडून ४४ कोटी रुपये मिळाले असून १८ कोटींचा निधी येणे बाकी आहे़ पहिल्या टप्प्यात केंद्राकडून ३९ कोटी रुपये येणे अपेक्षित आहे़ याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरु आहे. पण अद्याप निधी मिळालेला नाही़ लवकरच निधी मिळेल अशी अपेक्षा लागून आहे, असे नरसय्या आडम यांनी सांगितले.
केवळ साडेपाचशे घरे पूर्ण- कुंभारी येथे असंघटित क्षेत्रातील तीस हजार कामगारांकरिता कामगार वसाहत होत आहे़ तीस हजार पैकी साडेसोळा हजार घरांना मंजुरी मिळाली असून यातील सात हजार घरांचा पाया तयार झालेला आहे़ साडेसोळाशे घरांचा जोता पूर्ण झालेला आहे़ तर फक्त साडेपाचशे घरे पूर्ण तयार आहेत़
कुंभारीच्या माळरानावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नियोजित घरांचे बांधकाम सुरू आहे. नियोजित वेळेनुसार घरकूल प्रकल्पास निधी मिळेना़ जोपर्यंत नियोजित निधी मिळत नाही, तोपर्यंत घरांच्या कामांना वेग येणार नाही. गेल्या चार महिन्यांपासून निधीअभावी काम थांबलेले आहे़ निधीकरिता आम्ही केंद्राकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. निधी लवकर मिळेल, अशी आशा आहे.- नरसय्या आडम, माजी आमदार