‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणा; गरिबी मात्र कधीच हटली नाही! नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका
By रवींद्र देशमुख | Published: January 19, 2024 12:07 PM2024-01-19T12:07:18+5:302024-01-19T12:08:10+5:30
PM Narendra Modi In Solapur : ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल,असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले.
सोलापूर : देशात ‘गरिबी हटाव’ च्या अनेकदा केवळ घोषणा देण्यात आल्या; पण गरिबी कधीच हटली नाही. ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल,असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले.
मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते.
सोलापूर अन् स्वत:चं नातं सांगताना मोदी म्हणाले, सोलापूर ही श्रमिकांची नगरी आहे. माझं कार्यक्षेत्र अहमदाबाद आहे. तीही श्रमिकांची नगरी आहे. यंत्रमाग कामगार तेथेही आहेत. पद्मशालीे कुटुंबं अहमदाबादमध्येही आहेत. मी अनेकदा त्यांच्याकडे जेवायचो. छोट्या घरात राहायचे; पण जेऊ घालायचे. कधी त्यांना स्वत:ला जेवण मिळाले नाही;पण मला रात्री उपाशी झोपू दिले नाही, असेही मोदी म्हणाले.
२२ जानेवारीला आपण नवीन घरात गेल्यानंतर रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात -
रामलला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत असताना सोलापुरात एक लाख लोकांचा नवीन गृहप्रवेश होत आहे. २२ जानेवारीला आपण नवीन घरात गेल्यानंतर रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते.