सोलापूर : केवळ मागासवर्गीय असल्याने घर सोडून जा, अन्यथा माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून विवाहितेस थंड पेयातून विष पाजून खून केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासºयाला जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ डी. के. अनभुले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पती मोहन विठ्ठल मळगे (वय २०), सासू पद्मिनी विठ्ठल मळगे (वय ४०), सासरा यशवंत विठ्ठल मळगे (वय ४५, सर्व रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मयत निकिता हिला आई-वडील नसल्याने ती मोहोळ येथे मामाकडे राहत होती. ती मागासवर्गीय समाजाची होती. तिचा मोहन मळगे याच्याशी ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रेमविवाह झाला होता.
लग्नानंतर निकिता ही पतीच्या वडवळ येथील घरी राहत होती. कालांतराने तिघेही तिला तू खालच्या जातीची आहेस, आमचे नातेवाईक नावे ठेवत आहेत. आम्हाला वाळीत टाकणार आहेत, तू तुझ्या मामाच्या घरी निघून जा. इथे रहायचे असेल तर एक लाख रुपयाचा हुंडा घेऊन ये, अन्यथा तुला ठार मारू, अशी दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करीत होते.
२० एप्रिल २०१४ रोजी आरोपी मोहनची भावजय माधुरी मळगे ही शेतात भेंडी तोडत होती, तेव्हा सर्व आरोपी शेतात आले. त्यांनी ‘माझा’ या थंड पेयातून थिमेट नावाचे विषारी द्रव पाजले. हा प्रकार मोहन मळगे याची १४ वर्षांची चुलत मेव्हणी छकुलीने पाहिला. आपले बिंग फुटेल, या भीतीपोटी आरोपींनी छकुली हिला देखील विष पाजले. दोघींना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे दोघींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी निकिताचे मामा प्रदीप गायकवाड यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०४ (ब), ४९८(अ), ३४ सह अॅट्रॉसिटी कायदा ३(२)(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. न्यायाधीशांसमोर सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे अॅड. गंगाधर रामपुरे यांनी मयत निकिता ही केवळ मागासवर्गीय असल्याने व हुंडा देऊ शकत नसल्याने आरोपींनी विषारी द्रव देऊन खून केला आहे.
१४ वर्षीय छकुली नेत्रसाक्षीदार असल्याने तिचाही विषारी द्रव देऊन खून केला, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास ६ महिन्यांची साधी कैद. भादंवि कलम ३०४ (ब) प्रमाणे जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार दंड केला. दंड न भरल्यास ६ महिन्यांची साधी कैद. भादंवि ३०२ प्रमाणे तिघांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजारांचा दंड, तो न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. गंगाधर रामपुरे, फिर्यादीतर्फे अॅड. नागेश जाधव यांनी काम पाहिले.
परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे लागली शिक्षा- विवाहित महिला निकिता व १४ वर्षीय मुलगी छकुली या दोघींना आरोपींनी विषारी द्रव पाजून खून केला. दोघींना साप चावल्याने मृत्यू झाल्याचा बनाव त्यांनी निर्माण केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात दोघींचा विषारी द्रव पाजल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. खुनात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुरावा सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आला. खटल्यात आरोपी मोहन मळगेची भावजय माधुरी मळगे, मयत निकिताचे मामा प्रदीप गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, औषध विक्रेता वैभव कोळे, तपासिक अंमलदार डीवायएसपी मनीषा दुबुले यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.