शीतलकुमार कांबळे
सोलापूर : सैफूलजवळील हेरिटेज पाम सोसायटीत विषारी घोणस साप आढळला. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी जेसीबी लावून सापाला शोधले. दोन दिवस चाललेल्या मोहिमेनंतर सापाला पकडण्यात यश आले.
शनिवार, १८ मेरोजी सोसायटीच्या परिसरात साप दिसला. तिथल्या रहिवाशांनी त्याचा फोटो काढून त्याची माहिती सर्पमित्राला दिली. निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र अक्षय रजपूत हे घटनास्थळी गेले. त्यांनी सगळीकडे पाहिले; पण साप आढळला नाही. त्याच दिवशी रात्री ८ वाजता साप मातीचा ढीग व काटेरी झाडांकडे जाताना दिसला. त्यावेळी सर्पमित्रांना परत बोलविण्यात आले. याहीवेळी साप दिसला नाही. परिसरात घुशीचे बीळ दिसून आले. त्यामुळे साप या बिळात गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला; पण साप विषारी असल्यामुळे कुणीच धोका पत्करायला तयार नव्हते.
शेवटी जेसीबी आणून मातीचा ढिगारा व काटेरी झुडपे काढण्याचे ठरविले. त्यानुसार परिसर स्वच्छ करण्यात आला. मात्र, साप न सापडल्याने सर्पमित्र कंटाळून घरी गेले. तेवढ्यात एका व्यक्तीला साप फरशीच्या आत लपून बसल्याचे दिसून आले. पुन्हा सर्पमित्रांना बोलविण्यात आले. त्यावेळी सर्पमित्रांनी सुरक्षितरीत्या सापाला पकडले.