सोलापूर : कायद्याचा बडगा केवळ दाखवून पोलीस प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासन मंदिरे पाडण्याचे काम करत आहे. अन्य धर्मियाच्या प्रार्थना स्थळांना हातही लावत नाही. धर्मांतराच्या घटनांवरही पायबंद घातला जात नाही. आता या विरोधात कृतिशील पाऊल उचलायला हवे, असे आवाहन श्रीराम युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजसिंह यांनी केले.
हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या वतीने बुधवारी जय भवानी हायस्कूलच्या पटांगणावर जाहीर सभा पार पडली. यावेळी टी. राजसिंह बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, हिंदू जनजागृती समिती पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाड्ये यांची उपस्थिती होती.
प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित वेणुगोपाल जिल्ला, पुरोहित नागराज रासकोंडा, पुरोहित भानुचंद्र चिप्पा यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्या कार्याचा आढावा हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी मांडला.
यावेळी आमदार राजसिंह यांनी आपल्या भाषणातून धर्मांतर, गोहत्या, हिंदुत्ववादी नेते आणि संतांच्या हत्या अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून मंदिरे पाडली जाताहेत. अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य समन्वयक मनोज खाड्ये, आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाड्ये यांनीही अनेक प्रश्नांवर आवाज उठवून जागे होण्याचे आवाहन केले.
सभेचे सूत्रसंचालन समितीचे विपुल भोपळे आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. या सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सोलापूर जिल्ह्यातील हिंदू प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.