माढा : कोराेना काळात फिरणाऱ्या मोकाटांविरोधात माढा पोलिसांनी धरपकड मोहीम राबविली. सापडलेल्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत दोन महिला अन् एक तरुण असे तिघे जण बाधित निघाले. दरम्यान मी टेस्ट केली... मला खूप गडबड आहे... मला काहीच झाले नाही, अशा स्वरात गयावया करणारे अनेक तरुण पाहायला मिळाले.
संचारबंदीत अनेक मुले ही घराबाहेर विनाकारण फिरताहेत. त्यांच्याविरोधात माढा पोलिसांनी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत काही जण कोरोनाबाधित निघाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार मानेगाव ग्रामीण रुग्णालय व पोलिसांच्या वतीने मानेगाव आऊट पोस्ट येथे नाकाबंदी राबविली. विनाकारण फिरणारे ३१ लोक पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये दोन महिला व एक तरुण पॉझिटिव्ह निघाला.
सहायक पोलीस निरीक्षक शाम बुआ, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, कॉन्स्टेबल अझर शेख, बालाजी घोरपडे, हवालदार अनिकेत मोरे यांनी ही करावाई कली. यावेळेस डाॅ. अक्षय वरपे, डाॅ. शिंदे यांनी या मोहिमेत योगदान दिले.
---
फोटो : १२ मानेगाव
मानेगाव येथे नाकाबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.