सांगोला : न्यायालयाकडील वॉरंट बजावून आरोपीस अटक करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयांना आरोपीच्या नातेवाईकांनी पकडून, शिवीगाळ, दमदाटीसह धक्काबुक्की करून आरोपीला पळून जाण्यास मदत केली. या प्रसंगाचे चित्रीकरण करणाºया पोलिसाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिल्याने दोन हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना २६ रोजी सकाळी मेटकर वस्ती येथे घडली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल वैजिनाथ कुंभार यांच्या छातीवर व उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली असून, डोक्यास मुक्का मार लागला आहे.
आनंदा बापू मेटकरी, पारुबाई आनंदा मेटकरी, कांचन कुमार मेटकरी, तानाजी आनंदा मेटकरी, कुमार आनंदा मेटकरी व पप्पू नावाची व्यक्ती (सर्व रा. मेटकर वस्ती, ता़ सांगोला) या सर्वांनी शासकीय कामात अडथळा आणून वॉरंटमधील आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे़
सांगोला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील आरोपी कुमार आनंदा मेटकरी याच्या नावे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या वॉरंटची तारीख २६ जुलै असल्याने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या आरोपीस पकडून शुक्रवारी सकाळी १० वाजता न्यायालयात हजर करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल वैजिनाथ कुंभार व पोलीस नाईक संजय पवार आरोपीच्या वस्तीजवळ गेल्यानंतर तुझ्यावर अजामीनपात्र वॉरंट असून, तुला आमच्या सोबत यावे लागेल. असे सांगताच त्याने वॉरंट दाखवा, असे सांगितले.
वॉरंट काढत असताना दुचाकी जागेवर सोडून तो पळून जाऊ लागला़ तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल कुंभार व पोलीस नाईक पवार हे दोघे त्याचा पाठलाग करू लागले. यावेळी पोलिसांना धरा सोडू नका, असे म्हणताच महिला व पुरुषांनी पोलिसांना घट्ट पकडून जागेवरच उभे केल्याने पोलीस हतबल झाले. यावेळी वडील आनंदा मेटकरी यांनी शिवीगाळ केली. यावेळी तानाजी मेटकरी याने पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांना धरून धक्काबुक्की केल्याने उजव्या हाताच्या करंगळीजवळ बोटास व छातीवर किरकोळ दुखापत तर डोकीला मागील बाजूस मुक्का मार लागला.
यावेळी पोलीस नाईक संजय पवार घडत असलेल्या प्रसंगाचे मोबाईलवरून चित्रीकरण करत असल्याचे पाहून महिलांनी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिल्याने मोबाईलचा डिस्प्ले फुटून नुकसान झाले. पोलीस वैजिनाथ संदिपान कुंभार यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी कुमार आनंदा मेटकरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.