सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये़ याशिवाय मतदानादिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गुरुवारी मोहोळ, शहर उत्तर व अक्कलकोटविधानसभा मतदारसंघातील आठ गावांमध्ये सशस्त्र रूट मार्च काढला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने गुरुवार १७ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बीबीदारफळ, वडाळा, नान्नज, कारंबा व मार्डी, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उळे व बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) तर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील कोंडी अशा एकूण आठ गावांमध्ये सशस्त्र पथसंचलन (रूट मार्च) करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक १, सीआयएसएफचे पोलीस अधिकारी २४, पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी २४, होमगार्ड ७ यांचा सहभाग होता.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ याबाबतचे परिपूर्ण नियोजन झाले असून, नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करून मतदान शांततेत पार पाडावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे.
३०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ याशिवाय ७८ लोकांना तात्पुरत्या स्वरूपात तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़