सोलापूर : संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी डॉ. आंबेडकर चौक येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान न थांबता पळून जाणाऱ्या कारचालकाला पाठलाग करून पकडण्यात आले. तेव्हा माझी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांशी ओळख आहे, असे सांगून कारवाई करू नका असे सांगणाऱ्या कारचालकाला अखेर दंडाची पावती करून सोडण्यात आले.
सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर चौकामध्ये फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा नाकाबंदी सुरू होता. दरम्यान छत्रपती शिवाजी चौकाकडून चारचाकी कार आली. तेव्हा नाकाबंदीमध्ये असलेल्या पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, ती न थांबता तशीच वेगात पुढे निघून गेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांना कारचा पाठलाग करण्यास सांगितले.
मंडले यांनी आपल्या मोटारसायकलवर कारचा पाठलाग केला. शेवटी काही अंतरावर जाऊन कारच्या समोर स्वतःची मोटारसायकल आडवी घातली. कारचालक जागेवर थांबला केव्हा कारमधील व्यक्ती माझी जिल्हाधिकाऱ्यासोबत ओळख आहे, मी शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना ओळखतो. असे म्हणू लागला तेव्हा साहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांनी त्याला पकडून पुन्हा डॉ. आंबेडकर चौकात आणले. कारमधील व्यक्तीने नाकाबंदी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षकाला पुन्हा मी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना ओळखतो. त्यांचे माझे चांगले संबंध आहेत असे सांगू लागला. तेव्हा पोलीस म्हणाले तुझी ओळख आहे तर मग नाकाबंदी तोडून पळून जायचं कारण काय? असा जाब विचारला.? बराच वेळ कारमधील व्यक्ती दंड भरण्यास तयार नव्हता तेव्हा पोलिसांनी चाकाला जामर बसवला. आपल्याला दंड भरल्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आल्यानंतर कारमधील व्यक्तीने पैसे भरून पावती घेतली आणि निघून जाण्यात धन्यता मानली.
नाकाबंदी दरम्यान आता अधिकाऱ्यांची दाखवली जाते ओळख
- पूर्वी संचारबंदीमध्ये पकडण्यात आल्यानंतर स्थानिक राजकीय नेते, नगरसेवक, आमदार, खासदार यांची ओळख सांगितली जात होती. मात्र पोलिसांना ही ओळख सध्या चालत नसल्याचे लक्षात आल्यानंतर थेट मोठ्या जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांची ओळख सांगून कारवाईपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न कारचालकाने केल्याचे दिसून आले.