अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भविष्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, ७ दिवस अगोदरच अकलूजमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुल्यबळ असणारे दोन्ही उमेदवार एकाच गावातील असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांनी दिली.येत्या १६ मे ला लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणी होणार असून, या दिवशी अकलूज शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी दक्षता घेतली आहे. शहरात आजपासूनच २४ तास नाकाबंदी, वाहन तपासणी, बॅरेगेटींग लावण्यात आले आहेत. प्रत्येकी २० कमांडोंचा सहभाग असणारी दोन दंगानियंत्रक पथके, प्रत्येकी ९ कमांडोंचा सहभाग असणारी २ जलद प्रतिसाद पथके एके ४७ रायफ ल, रिव्हॉल्व्हर व इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अकलूज व परिसरातील विविध भागांमध्ये १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. अकलूज पोलीस ठाण्याकडे असणारा सुमारे ७० पोलिसांचा स्टाफ या बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांच्या सोबत असणार आहे. शहरात रुट मार्च (ध्वज संचलन) करण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येऊन स्थानिक गुंड, अवैध धंदे, अवैध हत्यारे बाळगणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी दिला.उमेदवारांच्या निकालाच्या दिवसापर्यंतची परिस्थिती पाहून पोलीस बंदोबस्तामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील, पो. नि. विश्वास साळोखे, अजय कदम व इतर ५ अधिकारी काम पाहणार आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची मिटींग बोलावण्यात येणार आहे. या मिटींगमध्ये दोन्ही उमेदवारांनाही निमंत्रित केले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालावा, फ टाके, डीजे वाजवू नयेत, गुलाल उधळू नये, बॅनर लावू नयेत किंवा परिस्थिती चिघळेल अशी घोषणाबाजी करू नये अशी माहिती त्या मिटींगमध्ये देण्यात येणार आहे. बेकायदा जमाव जमवू नये, विजयी उमेदवाराने मिरवणूक काढू नये अशा सूचनाही देण्यात येणार आहेत. सध्या सोलापूर जिल्ात जिल्हाधिकार्यांकडून जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्या आदेशाची कोणीही पायमल्ली करू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी केले आहे.
अकलूजमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात
By admin | Published: May 09, 2014 9:13 PM