बार्शी : भरदिवसा बार्शी शहरात शिवाजी नगरात घराच्या आवारातून टेबलवर ठेवलेले पैशाचे पाकीट, मोबाईलसह बॅग चोरून नेणाऱ्या संशयिताला पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन पकडले. त्याला न्या. आर. एस. धडके यांच्या न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
विजय दत्तात्रय डोईफोडे (३१, रा. बार्शी) असे संशयीत आरोपीचे नाव असून २२ मार्च रोजी प्रकार घडला. याबाबत रोहित खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनुसार रोहित खेडकर घटनेच्या दिवशी पुण्यात इंजिनियरिंगची परीक्षा देऊन घरी आला होता. कोरोनाच्या भीतीने पैशाचे पाकीट, मोबाईल व बॅग सॅनिटायझर घराच्या मागील बाजूला टेबलवर ठेऊन तो बाथरूममध्ये गेला. हात धुऊन परत येईपर्यंत बाहेर ठेवलेली बॅग आणि साहित्य चोरट्यांनी पळविल्याचे निदर्शनास आले. यावेळी कंपाउंडवरून एकजण उडी मारून निघून जाताना दिसला. हवालदार दादा माने आणि त्यांच्या पथकाने त्याची माहिती काढली. बार्शी कुर्डूवाडी रोडवरील एका मंदिर परिसरात तो राहात असल्याचे पोलिसात तपासात स्पष्ट झाले. तो तो पोलिसांना पाहाताच पळत सुटला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले व न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत रवानगी केली.