शहाजी फुरडे-पाटील
बार्शी: कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र व शासनाने उपाययोजनांचा भाग म्हणून देशात ‘लॉकडाउन’ करुन संचारबंदी लागू केली आहे़ या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दादा आपल्या घरांची तमा न बाळगता २४ तास बंदोबस्तासाठी तैनात आहे. यामध्ये अनेक जण बाहेरगावचे आहेत. हॉटेल्स बंद असल्याने त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन मातृभूमी प्रतिष्ठान सरसावले आहे. शहरातील पस्तीस पोलिसांना दोन वेळचे जेवण जागेवर मोफत स्वरुपात पोहोच केले जात आहे़ याशिवाय दैनंदिन प्रतिष्ठानच्या अन्नपूर्णा योजनेचे ५०० हून अधिक डबे नियमित पुरवले जात आहेत.
कोरोनामुळे पोलीस तसेच वैद्यकीय यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे़ सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे हॉटेल्स देखील बंद आहेत़ साधा चहा देखील स्त्यावर मिळत नाही़ त्यामुळे अशा ड्यूटी बजावणाºया प्रशासनातील लोकांसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना पुढे येत आहेत़ बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये इतर ठिकाणांहून दंगाकाबू पथकातील पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केलेले आहेत़ या पोलिसांना जेवणाची अडचण होती़ ती मातृभूमी प्रतिंष्ठानच्या माध्यमातून दूर झाली आहे.
प्रतिष्ठानच्या पाटील प्लॉट येथील किचनमधून या पोलिसांसाठी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळचे जेवण प्रतिष्ठानच्या रिक्षामधून पोहोच केले जात आहे़ यामध्ये एका वेळेला तीन चपाती, सुकी भाजी आणि मसाला भात असा जेवणाचा डबा दिला जात आहे़ तसेच गेल्या चार वर्षांपासून समाजातील ज्यांना कोणी नाही, खाण्याचे वांदे आहेत अशा १६५ निराधारांना घरपोच दोन वेळचा डबा दिला जातो. तो देखील या काळातही सुरुच आहे़ शहरातील कॅन्सर हॉस्पिटल, जगदाळे मामा व इतर हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दहा रुपयात दोन चपाती व भाजी असे जेवण दिले जाते ते देखील काम सुरुच आहे.
गरिबांना मिठाई.. पाणी अन् सरबतचे वाटप- प्रतिष्ठानच्या दोन रिक्षा असून त्याद्वारे हे वाटप केले जाते़ याशिवाय शहरातील स्विटमार्ट चालकांनी देखील बंदमुळे दुकानातील माल खराब होण्यापेक्षा तो गोरगरिबांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसेच समर्थ वॉटर सप्लायर्सच्या वतीने देखील दुचाकी गाडीवर शहरात फिरुन शुद्ध पाणी पुरवण्याची ड्यूटी बजावत असलेल्या पोलिसांना जागेवर पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात आहे. - अतुल पांडे मित्रपरिवाराच्या वतीने गेले दोन दिवस दुपारी शहरात फिरुन पोलीस व आरोग्य कर्मचाºयांना चहा व सरबत दिले जात आहे़ ही सेवा संचारबंदी असेपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सचिन शिंदे यांनी बोलताना सांगितले.
सामाजिक भान- बार्शीतील उद्योजक दिलीप खटोड परिवाराच्या वतीने पोलिसांना सकाळचा नाष्टा गेल्या चार दिवसांपासून दिला जात आहे तर शुक्रवारपासून लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीने सायंकाळचा फलाहार व चहाची सोय केली जाणार आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे क्लबचे सचिव महावीर कदम यांनी सांगितले.