शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करकंब-नेमतवाडी रोडवर मेन कॅनॉलजवळ गणेश व्यवहारे हे मोटारसायकलवरून जात असताना एक व्यक्ती मोटारसायकल थांबवून मी पोलीस आहे, असे म्हणत लोकांकडून पैसे घेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर गणेश व्यवहारे यांनी तत्काळ करकंब पोलीस स्टेशनचे पोह विजय गोरवे यांना कळवले. सदर एमएच ४५ /एएन २५८१ मोटारसायकल ही असून त्यावर पुढील बाजुस मराठीमध्ये पोलीस असे लिहिले आहे. त्यावर तिरंगा झेंड्याचे स्टिकर असून पाठीमागेही इंग्रजीमध्ये पोलीस लिहिले आहे. त्यावेळी गणेश व्यवहारे यांना या तोतया पोलिसाने लायसन्स आहे का? असे विचारले. त्यावेळी व्यवहारे यांनी लायसन्स आहे असे म्हणाल्यावर तो तोतया पोलीस म्हणाला, मास्क नाही, तू दंड भर, पायात बुट आहेत, हेल्मेट नाही, तुम्ही दंड भरा असे म्हणत माझ्यासोबत अजुनही मोटारसायकली ते अडवत आहे व पैसे वसूल करीत असल्याचे करकंब पोलीस स्टेशनचे विजय गोरावे यांना माहिती दिली.
त्यानंतर पोह विजय गोरावे तसेच पोह घोळवे, पोह जाधव व पोना मोरे हे खाजगी वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गणेश व्यवहारे व इतर नागरिकांनी सांगितले की, आम्ही तुम्हाला फोन केल्याची शंका आल्याने तो नेमतवाडीकडे पळून गेला आहे. त्यानंतर करकंब पोलिसांच्या टीमने नेमतवाडीच्या दिशेने पाठलाग करायला सुरवात केली. त्यावेळी नेमतवाडीचे पोलीस पाटील, पेहे पोलीस पाटील व नांदोरे पोलीस पाटील यांना आम्ही फोनव्दारे सदरच्या इसमाचे व गाडीचे वर्णन सांगून अलर्ट करुन त्यास रस्त्यावर आडविण्यास सांगितले.
शिरसठ वस्ती, नांदोरे येथे लोकांनी दोन पिकअप रस्त्यावर आडवे लावून रस्ता बंद केला होता. त्यावेळी सदरचा इसम त्याची मोटारसायकल शेतातील बैलगाडी वाटेला घालून पुढे वाट संपल्यानंतर मोटार सायकल एमएच ४५ /एएन २५८१ ही जागीच सोडून चावी घेवून उसात पळून गेला. त्यानंतर पोलीस व स्थानिक नागरिकांनी यांचा शोध घेतला परंतु त्यावेळी तो पसार झाला.
मोटारसायकल नंबरवरून सदरची मोटारसायकल दादासाहेब लक्ष्मण पवार (रा. कोंडारपट्टा, ता. माळशिरस) यांची असून ती मोटारसायकल प्रशांत अनिल वाघ (रा. वेताळवाडी) हा घेवून गेला होता, अशी माहिती मिळाली. त्यावरून करकंब पोलिसांनी प्रशांत अनिल वाघ, (वय २८, रा. वेताळवाडी ता. माढा) यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द भादंवि कलम १७०, १७१ प्रमाणे कायदेशीर तक्रार केली आहे.