सोलापूर : पोलीस उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले परिमंडळ पथक (झोन स्कॉड) बरखास्त करण्याचे आदेश देऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सात जणांना पोलीस मुख्यालयाचा रस्ता दाखविला आहे. फौजदाराला नियंत्रण कक्षात पाठवले आहे.
पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांच्या अधिपत्याखाली एक परिमंडळ पथक (स्पेशल झोन स्कॉड) कार्यरत होते. स्कॉडमध्ये एक फौजदार आणि सात पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. हे स्कॉड शहरातील गुन्हे उघडकीस आणणे, अवैध धंद्यावर धाड टाकणे, गंभीर गुन्ह्याचा तपास करणे आदी कामे करीत होते. गुन्हे शाखेप्रमाणे हे स्पेशल स्कॉड काम करीत होते. शनिवारी रात्री अचानक पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाºयांना स्वतंत्र स्कॉड तयार करण्याची गरज भासणार नाही, असे वायरलेसवरून सांगितले होते.
आयुक्तांच्या या संदेशावरून झोन स्कॉड बरखास्त करण्याचे संकेत मिळाले होते. रविवारी स्कॉडमधील एका फौजदाराची नेमणूक मूळ ठिकाण असलेल्या नियंत्रण कक्षात झाली. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
मूळ ठिकाणाऐवजी पोलीस कर्मचारी मुख्यालयात- पोलीस उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली तयार करण्यात आलेल्या झोन स्कॉडमध्ये शहरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सदर बझार पोलीस स्टेशन, जेलरोड पोलीस स्टेशन आदी ठिकाणच्या पोलीस कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला होता. आयुक्तांनी दिलेल्या बरखास्तीच्या आदेशानंतर स्कॉडमधील फौजदाराला नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले. ज्या पोलीस स्टेशनमधून पोलीस कर्मचारी आले होते त्यांना मात्र मुख्यालयात अकार्यकारी पदावर पाठवण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्तांनी दिला दुजोरापोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशावरून परिमंडळ पथक (स्पेशल झोन स्कॉड) बरखास्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.