सोलापूर : मराठा आरक्षणासाठी शहर - जिल्ह्यात आंदोलनाचे लोण सर्वत्र पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शांतता - सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या अंकित असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी बजावले आहेत.ऐनवेळी निर्माण होणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी राखीव फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी आंदोलने, नाहक पसरविल्या जाणाऱ्या अफवा यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस ठाण्यांकडून सर्व स्तरावर खबरदारी घेण्यात येत आहे. सातही पोलिस ठाण्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत. राखीव फोर्सलाही ऐनवेळी उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी सतर्क राहून परिस्थिती संयमाने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेला झळ पोहोचणार नाही, याचीही दक्षता आंदोलकांनी घ्यावी. सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पोलिस खात्याकडून करण्यात आले आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीचा अन्य घटकांनी गैरवापर करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रवृत्तींवर लक्ष ठेवून शांतता प्रस्थापित ठेवण्याच्या सूचना सर्व ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्या असून, जनतेनेही सहकार्य करावे.- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त
"अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा सज्ज! सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश"
By विलास जळकोटकर | Published: November 02, 2023 4:18 PM