सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर निर्जन ठिकाणी गाठून मारहाण करत किंवा हिसकावून मोबाइल चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवसांत दोन घटना घडल्या असून, या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकबर रमजान शेख (वय ४५, रा. विनायकनगर, शेळगी, साेलापूर) हे २४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मार्केट यार्डकडून शेळगीकडे जात होते. दरम्यान, त्यांच्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपले त्यामुळे ते ढकलत पायी जात होते. पाठीमागून तिघेजण मोटारसायकलवर आले. त्यांनी पाठीमागून पाय लावतो, असे सांगून अकबर शेख यांना गाडीवर बसण्यास सांगितले. अकबर शेख हे गाडीवर बसल्यानंतर तिघांनी पाय लावून थोड्या अंतरावर ढकलत नेले. तिघांनी अचानक मोटारसायकल पुढे घेतली, त्यातील एकाने त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून घेतला आणि तेथून पोबारा केला. याप्रकरणी अकबर शेख यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस नाईक माने करीत आहेत.
अमर लक्ष्मण कानडे (वय ४५, रा. एफ ६, जमनोत्री अपार्टमेंट, दमाणीनगर, सोलापूर) व अमोल नामदेव देशमुख हे दोघे २५ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगाव येथून नसले हॉटेलच्या दिशेने जात होते. दरम्यान, अज्ञात तिघांनी त्यांना थांबवून पैशाची मागणी केली. अमर कानडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत अमर कानडे यांच्या कानाखाली लगावली. त्यांच्याजवळील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेतला तर त्यांच्यासोबत असलेल्या अमोल देशमुख यांचाही नऊ हजार रुपये किमतीचा मोबाइल काढून घेतला. तिघे जण दोन मोबाइल घेऊन तेथून पळून गेले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास फौजदार मंद्रुपकर करीत आहेत.
मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले...
हैद्राबाद-पुणे रोडवर मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्केट यार्ड येथे शेतीचा माल घेऊन येणाऱ्या मालट्रक चालकांचे मोबाइल अशाच पद्धतीने हिसकावून नेले आहेत. रात्री अंधाराचा फायदा घेऊन मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यातही अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. असे प्रकार सोलापूर-पुणे व हैद्राबाद-सोलापूर हायवेवर वाढले असून, अज्ञात चोरट्यांचा अद्याप तपास लागला नाही.