सोलापूर : वर्षभरापूर्वी आईचे निधन झाल्यावर मानसिक तणावाखाली आलेल्या युवकाने आत्महत्या करण्याच्या इराद्याने रेल्वे पूल गाठला खरा; मात्र, तेथून निघालेले पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि मंडले यांना त्याचा संशय आला. अगदी भावासारखी त्यांनी त्याची विचारपूस करीत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीतून त्या युवकाला जीवदान मिळाले. पोलीस आयुक्तांनी दोघा कर्मचाऱ्यांना बक्षिसे जाहीर करीत आयुक्तालयाची शान वाढविली आहे.
सोमवारी (दि. १) दुपारी शेख व मंडले हे पत्रकार भवन ते संभाजी तलाव या दरम्यान निघाले होते. कंबर तलावालगत रेल्वेपुलावर श्रीनिवास राजकुमार भोसले (वय ३८, रा. अशोक चौक) अगदी निराश होऊन थांबला होता. त्यांनी त्याला पुलावरून खाली आणत त्याची सहानुभूतिपूर्वक विचारपूस केली. त्याने कहाणी ऐकविली अन् आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे सांगितले. आयुष्य एकदाच मिळते, हार मानू नको; पुन्हा नव्या दमाने आयुष्याला सुरुवात कर, आम्ही दोघे तुझ्या पाठीशी आहोत, असा शाब्दिक दिलासा दिला. त्यानंतर त्याला सदर बझार पोलीस ठाण्यात नेले. तेथेही तेथील कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढली. दरम्यान, त्याचे वडील अन् नातेवाइकाना बोलावून घेण्यात आले. त्या युवकाला त्यांच्या स्वाधीन करीत पोलिसांनी आपले एक चांगले कर्तव्य बजावले.