टेंभुर्णी : पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबातील महिला व पुरुष यांना पोलीस ठाण्यात बोलावून जबरदस्तीने आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावून अमानवीय कृत्य केल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा पदभार काढून घेतला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची सोलापूर येथे नियंत्रण कक्षात नियुक्ती केली आहे.
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या आदेशानुसार २९ मे रोजी दुपारी १२च्या सुमारास १५ ते २० पोलीस कर्मचारी पाठवून पोलीस स्टेशनच्या कंपाउंड शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील महिला - तरुण मुली व पुरुष यांना बोलावून आवारातील साफसफाई करायला लावली. मानवी विष्ठाही उचलण्यास लावल्याची तक्रार पाेलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती, तसेच संबंधितावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचे निलंबन करण्यात यावे, अशीही मागणी येथील मातंग एकता आंदोलन संघटना, लहुजी शक्ती सेना, भीम क्रांती मोर्चा, रिपाइं आठवले गट, रिपाइं (ए) गट, दलित स्वयंसेवक संघटना, महाराष्ट्र वडार समाज संघटना आदी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भेट देऊन सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची चौकशी समिती नेमली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल अहिरे यांनी रविवार व सोमवार या दोन दिवसात संबंधित महिला, पुरुष, पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे पन्नास ते साठ लोकांचे जवाब नोंदवले आहेत. त्यानंतर या चौकशीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना देण्यात आला आहे. या दरम्यान टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा पदभार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल अहिरे यांना देण्यात आला आहे.
वेट ॲण्ड वॉच
याबाबत तक्रारदार संघटनांच्या पदाधिकारी व संबंधितांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या दोन दिवसात काय निर्णय घेतात याबाबत वेट ॲॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
चौकट
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे खोटे बोलत आहेत. ते सांगतात की, आम्ही महिलांना बोलावले नव्हते त्या स्वतःहून आल्या होत्या. परंतु सोमवारी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पंधरा ते वीस पोलीस कर्मचारी व होमगार्ड वस्तीत शिरल्याचे दिसून येत आहे.
- नितीन कांबळे, अन्यायग्रस्त युवक
चौकट
जमावबंदीचे आदेश असताना पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी त्या आदेशाचा भंग करून महिला व पुरुष यांना एकत्र बोलावून त्यांना मानवी विष्ठा उचलावयास लावून अमानवीय कृत्य केले आहे. ते सध्या येथील काही लोकांना हाताशी धरून सामाजिक सलोखा बिघडण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर ॲट्राॅसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी.
रामभाऊ वाघमारे,
अध्यक्ष, मातंग एकता आंदोलन