कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात न करता, प्राथमिक स्वरुपात करण्यात येत आहे. असे असले तरी पोलिसांना त्यांचे काम करावेच लागत आहे. वारकऱ्यांनी पंढरपुरात गर्दी करू नये. यासाठी शहरासह तालुक्याच्या हद्दीत पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. या कामासाठी पंढरपुरात हजारो पोलीस आले आहेत.
पंढरपूरमध्ये ३०० च्या आसपास मठ आहेत. हे सर्व मठ यात्रा कालावधीत भाविकांनी फुल्ल झालेले असतात. मात्र, यंदा फक्त मानाच्या १० पालख्यांना २० वारकऱ्यांसह एस. टी.ने वारी करायची परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील सर्व मठ रिकामेच आहेत. यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची राहण्याची सोय मठ, महाविद्यालये, शाळा व भक्तनिवासामध्ये करण्यात आली आहे.
यामुळे पंढरपुरातील मठांमध्ये भाविकांऐवजी पोलिसांची गर्दी जमू लागल्याचे दिसून येत आहे. २० मठांमध्ये २५०० पोलीस कर्मचारी, वेदांत व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, सिंहगड व स्वेरी कॉलेजमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची सोय केली आहे. ही जबाबदारी पोलीस प्रशासनाने सपोनि. एम. एन. जगदाळे, फौजदार प्रशांत भागवत, पोलीस अभिजीत कांबळे यांच्याकडे दिली आहे.
-----
प्रत्येक पोलिसांना किट
बंदोबस्तासाठी आलेल्या प्रत्येक पोलिसाला रेनकोट, ग्लोज, सॅनिटायझर, कोलगेट व ब्रश, तेल बाटली, साबण, ग्लुकोंडी व खाण्याच्या इतर वस्तू असे किट वाटप करण्यात येत असल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि. अरुण पवार यांनी दिली.
----
फोटो : पोलिसांची राहण्याची सोय करण्यासाठी भक्तनिवासाची पाहणी करताना सपोनि. एम. एन. जगदाळे, उपपोनि. प्रशांत भागवत, उपपोनि. आकाश भिंगारदेवे.