माळशिरस : ग्रामीण भागात यात्रा अथवा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. यात्रेबरोबरच अनेक जुन्या चालीरिती, परंपरा जोडलेल्या असतात. अशा ग्रामीण भागातील अनेक यात्रांना कोरोना महामारीमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. येत्या तीन महिन्यांत साजऱ्या होणाऱ्या यात्रा व उत्सवासाठी पोलिसांनी संबंधित यंत्रणेला नोटीस बजावल्या आहेत.
यात्रेसाठी गर्दी झाल्यानंतर या यात्रांमधून ग्रामस्थांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी जत्रा थांबविण्याची गरज पुढे येत आहे. तालुक्यात कोरोना महामारी वाढत असून, रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्यामुळे पोलिसांनी ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये गावात होणारे उत्सव व यात्रा यासंदर्भात काटेकोर सूचना केल्या आहेत. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा यावर्षी होणार नाहीत. मात्र, दरवर्षीप्रमाणे पूजाअर्चा करण्याची परवानगी दिली जात आहे. इतर गर्दीच्या कार्यक्रमांवरही पोलिसांची करडी नजर आहे.
यात्रेला लागला ‘ब्रेक’
मार्च महिन्यात मोटेवाडी (मा) सिद्धनाथ यात्रा, उंबरे-दहिगाव महाशिवरात्री, पिलीव महालक्ष्मी यात्रा, एप्रिल महिन्यात फोंडशिरस महादेवाची यात्रा, जाधववाडी नाथ यात्रा, भांबुर्डी नाथ यात्रा, गोरडवाडी बिरोबा यात्रा, तरंगफळ श्रीनाथ यात्रा, माळशिरस, सदाशिवनगर, खडूस, पिलीव आदी गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तर मे महिन्यात मोटेवाडी येथे होणारी अहिल्यादेवी जयंती व शिंगोर्णी येथील महालक्ष्मी यात्रा अशा तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत १० ते १५ यात्रांना ‘ब्रेक’ लागला आहे.