टेंभुर्णी: भरधाव वेगात आलेल्या टेम्पोखाली चिरडून महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस नाईक ठार झाले. या अपघातानंतर पोलिसांनी पाठलाग करून मद्यधुंद अवस्थेतील टेम्पो चालकाला पकडले. सागर औदुंबर चौबे (वय ३४, रा. व्हनकळस प्लाॅट, बार्शी) असे मरण पावलेल्या पोलीस नाईकाचे नाव असून रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वरवडे टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सागर चौबे हे मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत होते. ते रविवारी पुणे-सोलापूर रोडवर वरवडे टोलनाक्यावर वाहन तपासणीचे काम करत होते. हैदराबादहून मुंबईकडे निघालेला टेम्पो (एम. एच. ०४/ एच.डी.०१७०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास वरवडे टोलनाका परिसरात आला. चालकाने सागर चौबे यांच्या अंगावरच टेम्पो घातला. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले.
अपघातानंतर टेम्पो चालक नवनाथ शिवाजी गुट्टे (वय ३०, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) हा पळून जाऊ लागला. इतक्यात महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळला.
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पडवळ, विजयकुमार लट्टे घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांनी अपघातस्थळी येऊन घटनेची माहिती घेतली. तसेच महामार्ग सुरक्षा पथकाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर हे देखील टेंभुर्णीत दाखल झाले. टेम्पो चालक नवनाथ गुट्टे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
दोन वर्षांपूर्वी आले होते बदलून
सागर चौबे हे २००७ च्या बॅचचे आहेत. ते दोन वर्षांपूर्वी मुंबई येथून सोलापूर जिल्ह्यात बदलून आले होते. मोडनिंब महामार्ग सुरक्षा पथकात दीड वर्षापासून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
--
फोटो : ०६ सागर चौबे, ०६ टेंभुर्णी कंटेनर, ०६ नवनाथ गुट्टे
वरवडे टोलनाका परिसरात चौबे यांच्या अंगावर गेलेला टेम्पाे पोलिसांनी पकडून ठेवला.
मद्यधुंद अवस्थेतील चालक नवनाथ गुट्टे.