रेवणसिध्द जवळेकर
सोलापूर : रात्रीचे १२ वाजून २५ मिनिटे झालेली... पुणे-सोलापूर एक्स्प्रेस हायवेवरून पांढºया रंगाची कार सुसाट वेगाने तुळजापूर नाक्याकडे निघालेली... तेथेच थांबलेल्या भरारी पथकातील एकाने शिट्टी मारतो अन् कार थांबते. ‘चला, डिकी उघडा. आतील बॅगा, पिशव्यांमध्ये काय ते दाखवा’ डिकी उघडली जाते, बॅगा अन् पिशव्या उघडल्या जातात; मात्र काहीच मिळत नाही. सात मिनिटांचा हा खेळ पाहून आतील तीन-चार महिला संतापवजा प्रेमानेच बोलतात, ‘साहेब, मोहोळ तालुक्यातील एका गावात आम्ही कीर्तन ऐकून परत चिखलीकडे निघालो. आम्ही सारेच माळकरी. इथे बुक्का, तुळशीहारशिवाय तुम्हाला काहीच दिसणार नाही’! यावरून त्या पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी ‘आमचे कामच आहे. ते केलं, सॉरी बरं का!’ असे म्हणत त्यांचा निरोप घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २७ दिवसांपासून शहरात येणाºया प्रत्येक नाक्यावर ‘मिशन नाकाबंदी’ सुरू आहे. जुना पुणे नाका, तुळजापूर नाका, मरिआई चौक येथील नाकाबंदी चालते तरी कशी? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ चमूने रविवारी आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग केले. रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी चमू जुना पुणे नाक्यावर पोहोचला. उड्डाण पुलाच्या खालीच स्थिर सर्वेक्षण पथकाचा फलक दिसला. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत महापालिकेचे अविनाश अंत्रोळीकर, संजय बुगडे, पोलीस कॉन्स्टेबल ओंबासे, वाहतूक शाखेचे महेश साळी आणि व्हिडीओग्राफर कुमार दिड्डी हे रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसले. पैकी महेश साळी हे येणाºया काही संशयित वाहनांना शिट्टी मारून थांबवत होते. एकामागून एक कार येत होत्या. एमएच-१३/सीएस-८३३९, एमएच-१३/सीके ७९६७, एमएच-४६/ए-४००, एमएच-२५/एएल-९५९९ या कारची झाडाझडती घेत असताना चालक आणि आतील प्रवासी पोलिसांसह पथकातील इतरांबरोबर वाद घालत असतानाचेही चित्र दिसत होते.
रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी ‘लोकमत’ चमू जुना पुणे नाका येथून उड्डाण पुलावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसºया प्रवेशद्वारासमोर पोहोचला. काही दिवसांपूर्वी या प्रवेशद्वारासमोर मांडव टाकून शहर पोलिसांनी नाकाबंदीचे स्थळ निश्चित केले होते, मात्र तेथे कुणीच नव्हते. पुढे हैदराबाद रोडवर कुठे तरी असेल या विचाराने चमू तेथून काही अंतर पुढे गेला, पण कुठेच नाकाबंदी दिसून आली नाही. तेथून चमू मार्गस्थ झाला ते शिवाजी चौकात. तेथे एका दुकानासमोरील कट्ट्यावर एक पोलीस आपल्या मोबाईलमध्ये दंग असल्याचा दिसला.
साडेबारा वाजताचे हे चित्र पाहून चमू पुढे मेकॅनिकी चौक, भैय्या चौकमार्गे मरिआई पोलीस चौकीसमोर दाखल झाला. रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी मरिआई पोलीस चौकीसमोर पोलीस कॉन्स्टेबल श्रीशैल म्हेत्रे, सतीश माने, कृष्णात तेली, वाहतूक शाखेचे पंकज घाडगे, जलसंपदा विभागाचे ए. ए. शेख हे आपली ड्युटी बजावत होते. तपासणी होणाºया वाहनांचे चित्रण विनायक गाडीपल्ला हा आपल्या व्हिडीओत कैद करीत होता. रात्री १ वाजून १० मिनिटांनी चमू होटगी रोडवरील आसरा चौकात पोहोचला. तेथे नाकाबंदीची वाट लागल्याचे दिसले. एकही अधिकारी, कर्मचारी चौकात गस्त घालताना दिसून आला नाही.
एका नाकाबंदीवेळी २५० वाहनांची तपासणी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे नाका, तुळजापूर नाका, हैदराबाद नाका, देगाव नाका, विजापूर नाका, होटगी नाका आदी ठिकाणी सकाळी ८ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ या दोन टप्प्यांमध्ये नाकाबंदी सुरू आहे. एका टप्प्यात अंदाजे २५० वाहनांची झाडाझडती घेतली जाते. ही नाकाबंदी प्रभावी ठरावी म्हणून निवडणुकीचे निरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी राऊंंड मारून येताना पथकातील संबंधितांकडून अहवाल घेतात. ‘प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करा. कुणी राजकीय नेता असो अथवा एखादा व्हीआयपी, कुणीही नाकाबंदीतून सुटता कामा नये’ असा आदेश देताना हे अधिकारी त्यांना जणू ‘जागते रहो’चा इशारा देत असतात.
वडिलांच्या निधनानंतर लागलीच ड्यूटीच्मरिआई चौकासमोरील नाकाबंदीवेळी ड्यूटी बजावत असताना प्रशांत बाळशंकर यांच्या वडिलांचे निधन झाले. निवडणूक कार्यालयातून त्यांना जेमतेम दोन-तीन दिवस रजा मिळाली. मात्र निवडणूक म्हणजे देशप्रेम, देशकर्तव्य म्हणून बाळशंकर हे दु:ख विसरून सोमवारी ड्यूटीवर हजरही झाले.