पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. माघील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या धर्तीवर हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा होणार आहे. मात्र, पालख्यांची मागणी लक्षात घेऊन वाखरी ते पंढरपूर या मार्गावर मानाच्या दहा पालख्यांना पायी चालण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यादृष्टीने वाखरी पालखी तळावर कराव्या लागणाऱ्या तयारीचा आढावा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी यांनी घेतला.
या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आज पंढरपुरात दाखल होत आहेत.
यावर्षीचा आषाढी यात्रा सोहळा ही गतवर्षीप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपाचा होणार असला तरी पालख्यांच्या आक्रमक धोरणातर मनाच्या दहा पालख्या व त्यामधील भाविकांना वाखरी - पंढरपूर या मार्गावर पायी चालण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय यादरम्यान एक रिंगन सोहळाही होणार आहे. त्यामुळं हा पालखी मार्ग व पालखी तळावर भाविक, नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी संपूर्ण वाखरी पालखी तळाला बांबूच्या बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे. मानाच्या पालखीसाठी स्वतंत्र मंडप, चौथरा, आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त, पाणी, वीज, स्वच्छता आदी नियोजन करावे लागणार आहे.
त्या धर्तीवर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बैठक घेतली. सर्व मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर एसटी बसने येणार आहेत व तेथूनच सर्व विधी परंपरा पूर्ण केल्यानंतर पंढरपूरकडे पायी चालत जाणार आहेत. त्यामुळे हा तळ प्रशासनाच्या तयारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी यांनी बॅरिकेट, मंडप, स्वछता, लाईट, पाणी याबाबत आढावा घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---
जिल्हाधिकारी घेणार आढावा
कोरोनाच्या धर्तीवर सलग दुसऱ्याऱ्या वर्षी आषाढी यात्रा सोहळा संपन्न होत आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून महसूल, पोलीस, पंचायत समिती, नगरपालिका प्रशासन तयारी करीत आहे. त्या तयारीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आज पंढरपुरात येणार आहेत. आषाढी महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये येणार आहेत. त्यादृष्टीनेही आढावा घेणार आहेत.
--
फोटो : ०६ वाखरी
वाखरी पालखी तळाची पाहणी करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक अरुण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी.