आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते, परंतु जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाला मायेचा आधार देत त्यांची रेशीमगाठ बांधण्यात चक्क अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची घटना नुकतीच वळसंग येथे घडली. एरव्ही नवरा-बायकोच्या भांडणाची प्रकरणे पोलीस ठाण्यात येतात. ती मिटवता-मिटवता पोलिसांच्या नाकीनऊ येते. शुक्रवारी मात्र वळसंग पोलीस ठाण्यात वेगळीच धावपळ सुरू होती. तणावग्रस्त माणसांची लगबग आणि गावातील प्रतिष्ठितांच्या सल्ला-मसलतीमुळे एका प्रेमीयुगुलाचे प्रकरण गंभीर बनले होते. यावेळी निर्माण झालेल्या वातावरणाचा शेवट अत्यंत गोड झाला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय झाला अन् वातावरण निवळले. वळसंग येथील कुर्ले आणि कलशेट्टी कुटुंबातील युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात गर्क होते. अशातच तिचे लग्न कर्नाटकातील युवकाशी ठरले. पसंतीचा विचार न करता आई-वडिलांनी तिच्या लग्नाचा एकतर्फी निर्णय घेतला. लग्नाच्या आणा-भाका घेतलेल्या प्रियकराशी होणारा वियोग सहन न झाल्याने तिच्या मनात आत्महत्येचा विचार चमकून गेला. कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जाणारे वळसंगचे पोलीस अधिकारी इंद्रजित सोनकांबळे यांच्याशी तिने संपर्क साधला अन् आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, साहेब मला ठरलेले लग्न मान्य नाही. माझ्या मित्राशीच लग्न करेन नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तरुणीच्या या द्विधा मन:स्थितीत अधिकारी सोनकांबळे यांनी तिला आधार देण्याचा निर्धार केला. तिची सविस्तर माहिती घेतली. प्रियकराच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांची मते जाणून घेतली. युवतीच्या आई-वडिलांसह वळसंगच्या प्रतिष्ठितांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. अधिकारी म्हणून नव्हे तर एका मुलीचा बाप म्हणून तिचा हट्ट पूर्ण करणे, ही आपली जबाबदारी आहे, या भावनेने सपोनि सोनकांबळे यांनी दोन्ही कुटुंबीयांमध्ये समन्वय घडवून आणला. प्रेमी युगुलाची रेशीमगाठ बांधण्याचा निर्णय झाला.-------------------------लग्नाला दिला होकारइकडे लग्न ठरलेल्या कर्नाटकातील युवकाशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यांनीही आनंदाने तिच्या लग्नाला होकार दिला. दिवसभर वळसंग पोलीस ठाण्यात हीच धावपळ होती. सपोनि इंद्रजित सोनकांबळे यांनी बजावलेली भूमिका ग्रामस्थांनाही प्रभावित करणारी ठरली.---------------केवळ वाद मिटविणे एवढेच पोलिसांचे काम नाही. सामाजिक भान राखून काही अनर्थ घडू नये, यासाठी कधी आई-वडिलांचीही भूमिका बजावावी लागते. मी तेच केले. दोन जीव एकत्र आले. त्याचा आनंद आहे. -इंद्रजित सोनकांबळेसपोनि, वळसंग पोलीस ठाणे